संभाजीराजेंच्या नेतृत्वाला सुरुंग?; मराठा आंदोलनात फूट?


Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाला सुरुंग लागला आहे. त्यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर तासाभरातच आंदोलनाची हाक देऊन कोल्हापुरातच त्यांना आव्हान देण्यात आले. यामुळे एकसंध चाललेल्या आंदोलनाला फुटीचे गालबोट लागले आहे. ‘संयम नको, आक्रमकपणा हवा,’ असे सांगून अनेकांनी वेगवेगळी चूल मांडल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात पुन्हा लढाई सुरू झाली आहे. खासदार संभाजीराजेंनी यामध्ये पुढाकार घेऊन आंदोलनाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालीच हा लढा लढण्यास राज्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयांकसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मान्यता दिली. त्यानुसार त्यांनी आंदोलनाचे टप्पे पाडले. आंदोलनाची दखल घेऊन सरकारने मागण्या मान्य केल्या. त्यामुळे संभाजीराजेंनी एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित केले.

महिनाभर अतिशय व्यवस्थित सुरू असलेल्या या आंदोलनात आता अचानक फूट पडली आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. संभाजीराजे आक्रमक होतील आणि राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात ठिणगी पेटेल असे भाजपला वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. यामुळे या पक्षाचे नेते त्यांच्यावर नाराज झाले. ते महाविकास आघाडीला पूरक भूमिका घेत असल्याची टीका त्यांच्यावर झाली. भाजपच्या काही नेत्यांनी स्वतंत्र आंदोलनाची भाषा सुरू केली. आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला. या पक्षाच्या तालावर नाचणारे मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश पाटील यांनी मुंबईत गोलमेज परिषद घेण्याची जाहीर केले, विनायक मेटे यांनी मोर्चा काढला. या सर्व घटनेतून भाजपने आपली चूल वेगळी मांडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.

एकीकडे संभाजीराजेंना आव्हान देताना दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढण्यास मान्यता देऊन भाजप सहभागी होत राहिले. ‘राजे सांगतील ते धोरण,’ अशी भूमिका कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजा’ने घेतली. राज्यभरातील सकल मराठा समाजानेही हीच भूमिका घेतली. मात्र, आठ दिवसांत कोल्हापुरातच राजेंना आव्हान दिले गेले. त्यांनी नाशिकमध्ये आंदोलन स्थगितीची घोषणा करताच कोल्हापुरात ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक देण्यात आली. ज्या कोल्हापुरातून आरक्षणाच्या लढाईची ठिणगी पेटली, त्याच कोल्हापुरातच संभाजीराजेंच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले.

मराठा आरक्षण हेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमचे आंदोलन वेगळे असले तरी ते संभाजीराजेंना बळ देणारे आहे. फक्त आमचा मार्ग वेगळा आहे. ही एक नवीन व्यूहरचना आहे.

– अॅड. बाबा इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते

संभाजीराजे हे आरक्षणाच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करून पूरक मागण्यावरच भर देत आहेत. त्यामुळे आमचे समाधान होत नसल्याने आम्हाला मराठा आरक्षणाच्या मूळ मागणीसाठी हे आंदोलन करावे लागत आहे.

– प्रा. जयंत पाटील, सकल मराठा समाजSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: