भाजपाच्या नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा; बंडखोरांच्या खेळीने खळबळ


हायलाइट्स:

  • जळगाव महापालिकेत खळबळ
  • भाजपच्या नगरसेवकांना नोटीसा
  • २७ नगरसेवकांना बजावल्या नोटीसा

म. टा. प्रतिनिधी, जळगावः जळगाव महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडीत व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात का येऊ नयेत? यासाठी आज विभागीय आयुक्तांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. शिवसेनेला मदत करणाऱ्या बंडखोरांच्या या खेळीने महापालिकेतील भाजपा बॅकफूटवर आली आहे. भाजपच्या फुटीर गटातर्फे गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर निर्णय देतांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. दरम्यान, आपल्या गटाकडे सर्वाधीक ३० नगरसेवक असून पक्षाचे सभागृहातील गटनेता हे दिलीप पोकळे असतील असे पत्र देखील या गटातर्फे देण्यात आले. नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. भाजपच्या २७ नगरसेवकांनी याचे उल्लंघन केले. यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले असल्याने त्यांना अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज केला होता.

वाचाः विमानतळाच्या उद्घाटनावरून मानापमान; ‘लघु’ अक्षरांमुळं नारायण राणे नाराज

या अर्जावर निर्णय देतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली आहे. आज ही नोटीस बजावण्यात आली असून यावर संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेत लवकरच स्थायी समिती सभापतींची निवड होणार आहे. या आधीच गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावरील सुनावणीत विभागीय आयुक्तांनी भाजप सदस्यांना नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाचाः ‘भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील रेव्ह पार्ट्यात दिसते, तसे…’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: