मुंडन करून, प्रायश्चित्त घेत 200 भाजप कार्यकर्त्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश


पश्चिम बंगालच्या हुगळीतील भाजपच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी मुंडन करून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये जाणे ही आपली चूक होती, असे त्यांनी कबूल केले आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी मुंडन करून अंगावर पवित्र गंगाजल शिंपडून तृणमूलमध्ये घरवापसी केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

हुगळीतील आरामबागमधील खासदार अरुपा पोद्दार यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. एका कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी आपली भेट घेतली आणि भाजपात जाणे ही आपली मोठी चूक होती, असे सांगितले. तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. भाजपमध्ये जाण्याच्या आपल्या चुकीसाठी आपण प्रायश्चित्त घेणार असल्याचेही ते आपल्याला म्हणाले. त्याप्रमाणे त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे, असे पोद्दार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी वीरभूमच्या भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अंगावर गंगाजल शिंपडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करत आहेत. निवडणुकीपूर्वी या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नुकतेच मुकुल रॉय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूलमध्ये घरबापसी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलमध्ये परत येण्याची इच्छा असलेल्यांना पक्षात परत घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर तृणमूलमध्ये परत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते तृणमूलमध्ये परत जात असल्याने भाजपची चिंता वाढली आहे. तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात येत असल्याने हे कार्यकर्ते घाबरून तृणमूलमध्ये प्रवेश करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: