एसटी बसची दुचाकीला धडक; विचित्र अपघातात मुलांसमोर आईचा मृत्यू


हायलाइट्स:

  • जळगावमध्ये भीषण अपघात
  • मुलांच्या डोळ्यासमोर आईने सोडले प्राण
  • अपघातात एकूण २ जण ठार, तर तिघे जखमी

जळगाव : जळगावमध्ये दोन दुचाकींना एसटीने धडक दिल्याने विचित्र अपघात (Jalgaon Accident) घडला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद महामार्गावर कुसुंबा गावाजवळ घडला. लिलाबाई धोंडू सोनार (वय ५५) व गजानन किसन बावस्कर (वय ३२, दोघे रा. चिंचखेडा, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.

शहरात उपचार घेण्यासाठी आलेली महिला रुग्णालयात चौकशी करुन गावातीलच तरुणाच्या दुचाकीवरुन घरी परत निघाली होती. दुसऱ्या एका दुचाकीवर महिलेचे दोन मुले व सुन देखील होती. महामार्गावर भरधाव एसटीने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. या अपघातात महिलेसह दुचाकी चालविणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. याचवेळी अपघातात दुसऱ्या दुचाकीलाही बसची धडक लागल्याने त्यावरील महिलेचे दोन मुले व सुन देखील किरकोळ जखमी झाली.

BJP and Shiv Sena: ‘भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास नवल वाटायला नको’; भाजप नेत्याचे वक्तव्य

जामनेर तालुक्यातील चिंचखडा येथिल लिलाबाई यांना किडनी स्टोनचा त्रास आहे. लिलाबाई यांचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर हा सुप्रीम कंपनीत कामाला असून त्याच्या इएसआयसीच्या सुविधेवर शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना मानस होता. आज मंगळवारी त्यांच्यावर उपचार करण्याचे ठरले. सोनार कुटुबियांना मदत करण्याच्या उद्देशाने गावात राहणाऱ्या गजानन बावस्कर याने मदत केली. सकाळी १०.३० वाजता त्याने लिलाबाई यांना स्वत:च्या दुचाकीवरुन (एमएच १९ सीएन ४०५३) जळगावात आणले. तर दुसऱ्या दुचाकीवर महिलेची मुले ज्ञानेश्वर धोंडू सोनार (वय ३५), योगेश धोंडू सोनार (वय ३०) व सून सुरेखा ज्ञानेश्वर सोनार (वय ३३, तिघे रा. चिंचखेडा, ता. जामनेर) हे होते.

जळगाव येथे रुग्णालयात आल्यानंतर उपचारास अडचण आली. त्यामुळे हताष होऊन हे सर्वजण पुन्हा गावी जाण्यासाठी निघाले. कुसुंबा गावाजवळ दोन्ही दुचाकी शेजारी चालत असताना मागून आलेल्या भरधाव एसटी बसने (एमएच २० बीएल २१९८) दोन्ही दुचाकींनी जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर सोनार चालवत असलेली दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजुला कलंडली. त्यामुळे त्यावर असलेले तिघे किरकोळ जखमी झाले. गजानन चालवत असलेली दुचाकी थेट एसटीच्या चाकाखाली आली. यामुळे गजानन व लिलाबाई जागीच ठार झाल्या.

बसचालक झाला फरार

या अपघातानंतर बसचालक घटनास्थळाहुन पसार झाला होता. कुसुंब्यातील नागरिकांनी जखमी व मृतदेहांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच चिंचाखेडा ग्रामस्थांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मृत लिलाबाई यांच्या पश्चात पती धोंडू पंढरी सोनार, मुले ज्ञानेश्वर व योगेश, सुन सुरेखा असा परिवार आहे.

डोळ्यासमोर आईचा मृत्यू!

या अपघातात गजानन बावस्कर यांचाही मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सोनार यांचे मित्र असल्यामुळे ते मदत करण्यासाठी लिलाबाई यांना दुचाकीवरुन जळगावात घेऊन आले होते. परंतु, दुर्दैवाने त्यांचाही मृत्यू झाला. गजानन यांच्या पश्चात आई-वडील, मोठे भाऊ ज्ञानेश्वर, पत्नी कोमलबाई, मुलगा तुषार (वय ४) व सव्वा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. या अपघातामुळे त्या चिमुरडीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. दुसरीकडे डोळ्यादेखत आईचा अपघाती मृत्यू झाल्याने सोनार भावंडासह लिलाबाई यांच्या सून सुरेखा यांना मोठा धक्का बसला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: