Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी


हायलाइट्स:

  • संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
  • शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या.
  • मंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

अमरावती: मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ही स्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत राज्यमंत्र्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा व त्यांच्याकडेही मागणी केली. ( Bacchu Kadu Writes To Uddhav Thackeray )

वाचा:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पीकाचीही हानी झाली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटामध्ये सापडला असून तोंडावर असलेल्या रब्बी हंगामाची पेरणी खोळंबेल की काय, अशी भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना भक्कम पाठबळाची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांकडे केली. शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. परिस्थिती कशीही असो शेतकरी आपल्या कर्तव्याला कधीही चुकत नाही. त्यामुळे संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती राज्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.

वाचा: राज्यात नवरात्रोत्सवामध्ये गरबा घुमणार, पण…; टोपे यांची मोठी घोषणा

दरम्यान, विरोधी पक्षाकडूनही याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. ‘राज्याच्या काही भागात पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेलंच आहे, शिवाय घरादाराचेही फार नुकसान झाले आहे. वेळ आणीबाणीची आहे. अशावेळी पंचनाम्याचे सोपस्कार करण्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी’, असे नमूद करत राज यांनी राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पत्रात केली आहे. आता सरकारमधील मंत्र्यानेही हीच मागणी केल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाव वाढल्याचे दिसत आहे.

वाचा: नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र; कारण…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: