Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा रद्द! काँग्रेसनं दिलं भाजपला ‘हे’ आव्हान


हायलाइट्स:

  • अमरनाथ यात्रा रद्द होताच काँग्रेसला मिळाला आयता मुद्दा
  • पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरणाऱ्या भाजपवर हल्लाबोल
  • सचिन सावंत म्हणाले, हिंमत असेल तर मोदींविरुद्ध बोला!

मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय केंद्रशासित जम्मू-काश्मीर प्रशासनानं घेतला आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसनं पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रह धरणाऱ्या भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अमरनाथ यात्रेच्या निर्णयाचा हवाला देत एक ट्वीट केलं आहे. ‘अमरनाथ यात्रा रद्द करणारा भाजप पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरत आहे. दुटप्पीपणा तो हा! धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाला वारीशी व वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही. फक्त हीन पातळीचं राजकारण करायचं आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

वाचा:संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर

पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रह धरणाऱ्या भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीवरही सचिन सावंत यांनी तोफ डागली आहे. ‘कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?, अशी विचारणा करतानाच, ‘हिंमत असेल तर आता मोदींच्या निर्णयाविरुद्ध बोला,’ असं आव्हानच सावंत यांनी भाजपला दिलं आहे.
मागील वर्षी अनलॉक सुरू होताच मंदिरे उघडण्यासाठी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलन केलं होतं. यंदा पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाजपनं राज्य सरकारला घेरलं आहे. भाजपची अध्यात्मिक आघाडी सातत्यानं सरकारवर हल्ले चढवत आहे. यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, असा आग्रह भाजपनं धरला आहे. निर्बंधासह का असेना, पण पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची इच्छा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून नियमावली तयार करावी. पायी वारीच्या बाबतीत यंदा आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपनं दिला आहे. मात्र, यंदाही प्रातिनिधिक स्वरूपात वारी होणार आहे. केवळ मानाच्या दहा पालख्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लालपरी’ धावणार आहे. त्यानंतरही भाजपनं सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आता भाजपला खिंडीत गाठलं आहे.

वाचा:‘भाजपनं आमच्याही कुटुंबाला त्रास दिला होता, पण…’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: