ऑलिम्पिक पदकविजेत्या रुपिंदर पाल सिंगचा आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा, भारताचा मौल्यवान खेळाडू निवृत्त


नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा स्टार ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. भारतीय संघात आता तरुण खेळाडूंना संधी मिळावी, अशी त्याची इच्छा आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. २०१० साली भारतीय संघात पदार्पण करणारा रुपिंदर भारताच्या सर्वात यशस्वी ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा स्टार ड्रॅग-फ्लिकर असलेल्या रुपिंदरने तरुण खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रुपिंदरने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केली असून त्यात म्हटले आहे की, ‘भारतीय हॉकी संघातून निवृत्त होण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. गेले काही महिने हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. टोकियोमध्ये माझ्या टीमसोबत व्यासपीठावर उभे राहण्याचा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही.

तो पुढे म्हणाला, ‘तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्याची आता वेळ आली आहे, असा माझा विश्वास आहे. मी गेल्या १३ वर्षांपासून भारतासाठी खेळत आहे. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे आमचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी आनंदाने संघ सोडत आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याच्या आठवणी मी सोबत घेऊन जात आहे. मला त्या सर्वांचा खूप आदर आहे. अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असलेले सहकारी माझी सर्वात मोठी ताकद आहेत आणि भारतीय हॉकीला पुढे नेण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.’

दरम्यान, सहा वर्षांचा असल्यापासून रुपिंदरने पंजाबच्या फिरोजपूर येथील शेरशाह वाली हॉकी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. सातत्याने कामगिरी सुधारत रुपिंदरने अव्वल स्थानापर्यंत मजल मारली. वर्ष २००२ मध्ये त्याने चंदीगड हॉकी अकादमीकडून खेळण्यास सुरुवात केली. तो २०१० मध्ये भारतीय संघाचा एक भाग बनला आणि संघासाठी खेळत राहिला. त्याने २०१०मध्ये सुलतान अझलान शाह कप दरम्यान पदार्पण केले. या स्पर्धेत टीम इंडियाला सुवर्णपदक मिळाले. रुपिंदरने या स्पर्धेत ब्रिटनविरुद्ध पहिली हॅटट्रिक केली. रुपिंदरची कारकीर्द पुढे नेण्यासाठी ही हॅटट्रिक खूपच उपयोगी ठरली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: