Nana Patole: नाना पटोले आक्रमक; संविधानाबाबत भाजपवर केला गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • नाना पटोले उतरले जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात.
  • पालघरमधील प्रचारसभेत भाजपवर केला गंभीर आरोप.
  • भाजपने देशाचे संविधानही बदलण्याचा घाट घातलाय.

पालघर: काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु, भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे. त्यामुळेच अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ( Nana Patole Vs BJP Latest News )

वाचा:चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचार सभेत पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला. त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजप सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू केली. भाजपने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस ९०० रुपये झाला आहे आणि एवढा महाग गॅस गरिबांना परवडत नाही त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तू बनून राहिली आहे. यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपचा डाव आहे.

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान

सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहील, असे पटोले म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे, किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होते.

दलित पँथरचा काँग्रेसला पाठिंबा

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी दलित पँथरने काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याने पाठिंबा देत असल्याचे दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.

वाचा:भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेशSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: