मोफत लसींसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानणारे फलक लावा; युजीसीचे विद्यापीठे, महाविद्यालयांना आदेश


विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने सगळ्या विद्यापीठांना, महाविद्यालयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे फलक, बॅनर लावण्याचे आदेश दिले आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानणारे हे बॅनर लावण्यास सांगितल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

युजीसीने विद्यापीठांना हिंदी आणि इंग्रजीमध्ये बॅनरवर छापण्यासाठीचा काही मजकूर आणि डिझाईन दिली आहे. ही डिझाईन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना तयार करून दिली आहेत. यामध्ये एक डिझाईन हे मोफत लसीकरणासाठी पंतप्रधानांचे आभार मानणारे असल्याचं इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे.

युजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सगळ्या कुलगुरुंना एक संदेश पाठवला आहे. 20 जून रोजी हा संदेश पाठवण्यात आला असून त्यात म्हटलंय की ‘केंद्र सरकार हे 18 वर्षावरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाला 21 जूनपासून सुरुवात करणार आहे. हे ध्यानात घेता विद्यापीठे, महाविद्यालये यांनी होर्डींग्ज/बॅनर्स त्यांच्या इमारतींमध्ये झळकवावेत.’

युजीसीच्या वेबसाईटवर अशा आशयाचा एक बॅनर आधीच झळकला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून त्यावर “सगळ्यांसाठी मोफत लस” (Vaccines for All, Free for All) अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचंही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युजीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी फोन उचलला नाही तसेच शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याचं इंडिया टुडेच्या बातमीत म्हटलंय.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: