‘गोव्यातील लोकांना भाजप हिंदूंचा तारणहार वाटत असेल तर…’


हायलाइट्स:

  • गोवा विधानसभा निवडणूकांचे पडघम
  • शिवसेनेनं साधला भाजपवर निशाणा
  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही टीका

मुंबईः ‘गोव्यातील लोकांना भाजप (BJP) हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजप ही गोव्यातील खरी बीफ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके बीफ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय?,’ असा सवाल शिवसेनेनं (Shivsena) केला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. ‘भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसे

‘गोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

‘मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही,’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

वाचाः भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश

‘काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष, पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही व त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचे अस्तित्वही उरले नाही. मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवला आहे. याला जबाबदार ‘मगो’चे सध्याचे नेतृत्वच आहे. पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: