करोनाची तिसरी लाट टळली?; मुंबईतील आकडे दिलासादायक


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबरच्या अखेरपर्यंत येईल असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात येत होता. मात्र मुंबईतील पालिका तसेच आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे अद्याप रुग्णसंख्या पाचशेच्या पलीकडे गेलेली नाही. त्यामुळे तिसरी लाट रोखून धरण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मास्क हे शस्त्र अतिशय उपयुक्त ठरले आहे. त्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मदत झाली आहे. लसीकरणाचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. हा प्रभाव वाढवायचा असेल तर लसीकरणाचा वेग अजून वेगाने वाढवायला हवा. मुंबईतील रुग्णसंख्या काहीवेळा २५०वरून ४५०वर पोहोचली आहे. मात्र लसीकरण आणि मास्क या दोन्हींचा सुयोग्य वापर करोना संसर्गाला रोखू शकेल, असा विश्वास अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केला.

रुग्णालयांत पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही. रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली नाही. तसेच जे रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत त्यांच्यातील आजाराची तीव्रता वाढलेली नाही. अनेक रुग्ण योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरु केल्यामुळे बरेही होत आहेत. गणेशोत्सव होऊन एक आठवडा झाला असला तरी रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली नाही. अजून दहा दिवस या स्थितीचे निरीक्षण करावे लागले, त्यानंतर काही निश्चित निष्कर्ष काढता येईल, असे पालिका प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये ४,६६७ उपचाराधीन रुग्ण असून त्यातील एक टक्का रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. मागील दोन्ही लाटांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण कमी आहे. यापैकी २,२४४ रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहेत. वांद्रे, भायखळा, चेंबूर हे प्रभागातील रुग्णसंख्येवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

विषाणूच्या स्वरूपावर अवलंबून

परावर्तित स्वरूपाचा विषाणू आला तरच तिसरी लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता राज्याच्या मृत्यूदर समितीचे विश्लेषण डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. लसीकरणामुळे संसर्ग नियंत्रणात आला आहे असे त्यांनी सांगितले. अॅण्टिबॉडीमुळे संसर्गावर नियंत्रण आले असून दोन्ही लशी उत्तम परिणाम दाखवत आहेत, असे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले. त्यामुळे केरळचा अपवाद सोडला तर नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. ६५ ते ७० टक्के व्यक्तींमध्ये अॅण्टिबॉडी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर वाटते असे ते म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: