मोठी बातमी! राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी कमी होणार


हायलाइट्स:

  • राज्यातील महिला पोलिसांसाठी खूषखबर
  • कामाचे तास आता १२ तासांवरून आठ तासांवर
  • स्थानिक पातळीवर प्रयोग राज्यभर राबवला जाणार

मुंबई: राज्यातील महिला पोलिसांसाठी एक खूषखबर आहे. राज्यातील महिला पोलिसांचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यानुसार, यापुढं महिला पोलिसांना १२ तासांऐवजी केवळ आठ तासांची ड्युटी लावली जाईल. (Working Hours of Women Police Personnel in Maharashtra)

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी आज ही माहिती दिली. पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सध्या १२ तास काम करावं लागतं. त्यांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. सण उत्सवाच्या काळात त्यांची बरीच फरपट होते. त्यातून त्यांच्या कामगिरीवर व कुटुंबावरही परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याची दखल घेऊन राज्य पोलीस दलानं महिलांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याचा उपक्रम सर्वप्रथम नागपूर शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीणच्या महिला पोलिसांनाही आठ तासांची ड्युटी लावण्यात आली होती. आता हा निर्णय राज्य पातळीवर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर… राजू शेट्टींचं थेट आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ‘महाराष्ट्र सरकारनं महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळं अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे,’ असं सुळे यांनी म्हटलं आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: