पेनटाकळी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांसाठी शिवसेना आमदारांनी धरणाच्या पाण्यात उडी घेत केले आंदोलन


पेनटाकळी प्रकल्पाच्या पाझरणार्‍या पाण्यामुळे होणार्‍या पिंकाच्या नुकसानीचा सर्व्हे अद्याप न झाल्याने सोमवारी शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी धरणाच्या पाण्यात उडी घेत चार तास पाण्यात बसून आंदोलन केले. मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाझरणार्‍या पाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाते व पिकांचे, जमिनीचे नुकसान होत आहे. 2012 पासून ही समस्या आहे. 22 मे रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या नुकसान भरपाई प्रश्नावर संबंधित अधिकार्‍यांना सर्व्हे करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. तर आमदार रायमुलकर यांनी 15 जूनपर्यंत अहवाल शासनाकडे न पाठविल्यास 21 जूनला पेनटाकळी धरणात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र अहवाल न तयार झाल्याने सोमवारी 11 वाजता आमदार संजय रायमुलकर हे पेनटाकळी धरणात गेले व शेतकर्‍यांसोबत आंदोलन सुरू केले. तासाभरानंतरही कोणीच न पोहोचल्याने त्यांनी रागाच्या भरात धरणात उडी घेतली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्यांना बाहेर काढले.

काही वेळानंतर पेनटाकळी प्रकल्प कार्यकारी अभियंता एस. डी. राळेकर, सहाय्यक अभियंता ए. एन. पाटील, तहसीलदार संजय गरकल घटनास्थळी दाखल झाले. चर्चेत सर्व मुद्यांवर पेनटाकळी अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिले की सर्व्हेमधून जे सुटले त्यांचा तहसीलदार आठ दिवसांत सर्व्हे करून घेतील व एकत्रित सर्व अहवाल मंत्रालयाकडे मंजुरातीसाठी एक महिन्याच्या आत पाठवला जाईल. तसेच कालवा बांधकाम व्यवस्थित न झाल्याने पाझरणार्‍या पाण्याचा शेतकर्‍यांना त्रास होतो. त्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येईल. तसेच मुख्य कालवा 1 ते 11 किमी प्रस्तावीत अस्तरीकरणऐवजी बंद नलिकेच्या कामाची तरतुद करण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या आश्वासनानंतर आमदार संजय रायमुलकर यांनी संध्याकाळी 4 वाजता आंदोलन मागे घेतले.

यावेळी सभापती माधवराव जाधव, सभापती दिलिपबापू देशमुख, सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, सरपंच रामेश्वर बोरे, संचालक भागवतराव देशमुख यांचेसह गावकरी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पेनटाकळी येथे जाऊन आंदोलनाला भेट दिली.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: