UN आमसभा: विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनाही लस प्रमाणपत्राची सक्ती


न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी सभागृहात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही आमसभा पुढील आठवड्यात सुरू होत आहे. न्यूयॉर्क शहराच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, त्यास संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहीद यांनी पाठिंबा दिला आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आमसभेसाठी १०० हून अधिक देशांचे प्रमुख, परराष्ट्रमंत्री, राजनैतिक अधिकारी सहभागी होत आहेत.

गेल्या वर्षी व्हर्च्युअल स्वरूपात आमसभा झाली होती. यंदा हायब्रीड पद्धतीने ही बैठक होणार आहे. त्यासाठी येणाऱ्या नेत्यांना करोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. न्यूयॉर्क शहराचे आंतरराष्ट्रीय विभागाचे आयुक्त पेनी अॅबेवर्देना आणि न्यूयॉर्कचे आरोग्य आयुक्त डेव्ह चोक्शी यांनी शाहीद यांना गेल्या आठवड्यात पत्र पाठविले असून, त्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सभागृहात उपस्थित राहणाऱ्या सर्वांना लस घेणे बंधनकारक आहे. शहराच्या नियमाप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या आवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असून, त्यानंतरच सभागृहात प्रवेश मिळणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनावर युएईने प्रभावी औषध शोधले?; चार दिवसात गंभीर रुग्ण ठणठणीत बरे!
या भूमिकेस शाहीद यांनी पाठिंबा दिला आहे. ‘मी या भूमिकेला पाठिंबा देत आहे. आमसभेचे कामकाज पूर्वपदावर येण्यासाठी या पावलाची गरज आहे. प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी सरचिटणीसांबरोबर संपर्क साधला जाईल,’ असे शाहीद यांनी म्हटले आहे. लसप्रमाणपत्र सक्ती करण्याबाबत अध्यक्षांबरोबर संपर्क केला जाईल, अशी भूमिका सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी घेतली आहे.

करोना लशीचा बुस्टर डोस हवा की नको? तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

लस नसलेल्यांसाठी सोय

शाहीद यांनी नुकतीच अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जर एखाद्या देशांत अजून लसच उपलब्ध झाली नसल्याचे त्या देशाच्या शिष्टमंडळाने सांगितले तर काय होणार असा प्रश्न त्या वेळी पत्रकारांनी त्यांना विचारला होता. ‘ प्रश्नाचे उत्तर नाही. लस न घेता किती शिष्टमंडळे येणार आहेत याची माहिती नाही. मात्र, त्यांना लस घ्यायची असेल तर त्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे यजमान देशाने कळविले आहे,’ अशी भूमिका शाहीद यांनी मांडली होती.

अमेरिका भारतात लष्करी तळ उभारणार?; परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचे संकेत
शाहीद यांच्या भूमिकेनंतर न्यूयॉर्कचे महापौर बिल दी ब्लेसियो आणि अॅबेवर्देना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आभार मानले. या आमसभेसाठी येणाऱ्या सर्वांच्या करोना चाचणी आणि लसीकरणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या परिसरात पुढील आठवड्यात केंद्र उभारले जाईल. या ठिकाणी मोफत करोना चाचणी आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ लशीचा पहिला डोस दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: