‘टाटा सुमो’ कार आणि जपानी कुस्ती प्रकाराचा काय संबंध आहे? वाचा…


टाटा सुमो म्हटलं की डोळ्यासमोर येते दोन दशकांपूर्वीची हिंदुस्थानी बनावटीची मजबूत मल्टी युटीलिटी प्रवासी वाहन. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात अफाट लोकप्रिय ठरलेली टाटाची ही कार उच्च मध्यम वर्गासाठी एखाद्या आलिशान एसयुव्हीसारखी वाटायची.

डिझाईन, आकार आणि अर्थातच नाव लक्षात घेता ही कर जपानी पैलवान सुमो यांच्या नावाने प्रेरित असेल, असेच प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वस्तुस्थिती पुर्णपणे वेगळी आहे. टाटा सुमो कार आणि जपानी सुमो पैलवानांचा काहीही संबंध नाही. सुमो हे नाव घेण्यात आले आहे ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग असणार्‍या टेल्को म्हणजेच टाटा इंजिनिअरींग अँड लोकोमोटिव्हचे सीईओ, टाटा स्टील कंपनीचे उपााध्यक्ष सुमंत मुळगावकर याांच्या नावावरुन.

सुमंत मुळगावकर यांच्या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरुन सुमोचे नामकरण करण्यात आले आहे. टाटाची वाहने 70 ते 90 च्या दशकात देशभरात लोकप्रिय करण्यात मुळगावकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या याच कामाला रेकग्निशन देण्यासाठी कंपनीने आपल्या महत्वाकांक्षी डिझाईनला म्हणजे सुमोला त्यांच्या नावाशी जोडले आहे.

मूळगावकर यांचे त्यांच्या कामाच्या प्रती असणार्‍या समर्पणाचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक गोष्ट हिंदुस्थानी मॅनेजमेंट क्षेत्रात अद्वितीय समजली जाते. मूळगावकर ट्रकचे उत्पादन करणार्‍या टाटा मोटर्सच्या प्लँटमध्ये काम करीत असताना तेथील सर्व मोठे अधिकारी एकत्र बसून लंच करीत असत. परंतु मूळगावकर मात्र त्यामध्ये सहभागी होत नव्हते.

ते नेमके लंचच्या वेळी कुठे तरी बाहेर निघून जात होते. त्यानंतर तासाभरानेच परतत असत. त्यामुळे मूळगावकरांच्या विरोधातील सहकार्‍यांनी अशी अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती की, त्यांना आमच्यासोबत लंच करणे आवडत नाही आणि ते आपल्या मर्जीतील टाटा डीलर्ससोबत फाईव स्टार हॉटेलमध्ये दररोज खाण्यासाठी जातात.

एक दिवस याची खात्री करुन घेण्यासाठी कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचारी लंच ब्रेकदरम्यान मूळगावकर यांच्या मागोमाग गेले. त्यावेळी त्यांना पहिला धक्का बसला की मूळगावकरांची गाडी कोणत्याही फाईव स्टार हॉटेलबाहेर नव्हे, तर हायवे शेजाारील एका ढाब्याबाहेर थांबली होती.

आत डोकावून पाहिले असता मूळगावकर चक्क काही ट्रक ड्रायव्हर्ससोबत गप्पा मारीत लंच घेत होते. त्यांचे बोलणे ऐकले असता पाठलाग करणार्‍यांच्या लक्षात आले की मूळगावकर ट्रक ड्रायव्हर्ससोबत गप्पा मारत असताना आपली ओळख न सांगता त्यांच्याकडून टाटा ट्रक्सच्या परफॉर्मनन्सचा गुपचूपपणे फीडबॅक घेत होते.

जेणेकरुन या फीडबॅकचा वापर करुन टाटाच्या वाहनांमध्ये चालकांच्या अपेक्षेनुसार अधिकाधिक सुधारणा करता येतील. त्यानंतर मूळगावकर ट्रक ड्रायव्हर्सकडून मिळालेला हा फीडबॅक थेट टाटा डिझाईन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे सोपवत असत. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: