टीम इंडियासाठी वाईट बातमी; शास्त्रींनंतर आणखी दोघांना कोरोनाची लागण; पाचव्या कसोटीतून बाहेर


INDvsENG : ओवल : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या तीन सदस्यांना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाचव्या कसोटीतून वगळण्यात आलं आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. रवी शास्त्री ५ सप्टेंबर रोजीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर, भरत अरुण, आर. श्रीधर आणि नितीन पटेल यांना देखील त्यांच्यासोबत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. रवी शास्त्रींसह इतर तिघांच्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या देखील करण्यात आल्या. यामध्ये शास्त्री, अरुण आणि श्रीधर यांचे निकाल पॉझिटीव्ह आले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, “दोन अँटीजेन चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शास्त्री आरटी-पीसीआर चाचणीमध्येही सकारात्मक आढळले आहेत. त्यांना घसा खवखवल्यासारखी सौम्य लक्षणे आहेत. ते दहा दिवस विलगीकरणात असतील. पुढील कसोटी १० सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने शास्त्री संघासोबत जाणार नाहीत. टीम इंडियाच्या तीन प्रशिक्षकांना कोरोना झाल्यामुळे आता फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड सर्व प्रशिक्षणाचे काम पाहतील. सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे, “फिजिओ संबंधीच्या कामासाठी संघाकडे योगेश परमार उपलब्ध आहेत. तसेच निक आणि सोहम हे दोन प्रशिक्षकही आहेत. या व्यतिरिक्त तीन मालिश करणारे आणि एक थ्रोडाउन तज्ज्ञ आहेत.

पुस्तक प्रदर्शनाच्या धावपळीत शास्त्रींना कोरोनाची लागण
दरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंचे अहवाल शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी झालेल्या दोन रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये नकारात्मक आले आहेत. सहाय्यक कर्मचारी आणि सर्व खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. शास्त्रींना त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी हॉटेलमध्ये कोरोना संक्रमणाचे बळी ठरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण यावेळी बाहेरचे अनेक पाहुणे आले होते. पटेल, श्रीधर आणि अरुणही त्यावेळी उपस्थित होते. “बीसीसीआय क्रिकेटपटूंसाठी वेगळा आयपीएल बबल तयार करत आहे आणि ते १५ सप्टेंबरला एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये प्रवेश करतील, असे यापूर्वीच ठरविण्यात आले आहे.

अलीकडच्या काळातील ही दुसरी मालिका आहे, जेव्हा भारतीय संघाशी संबंधित लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातही कोरोनाने शिरकाव केला होता. त्यावेळी कृणाल पंड्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर भारताचे आठ खेळाडू मालिकेबाहेर गेले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: