मोठी बातमी… विश्वचषकासाठी संघ जाहीर केल्यावर लगेचच पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप


कराची : अस्थिरता वैशिष्ट्य असणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता आणखी एका गोष्टीमुळे गोंधळ उडाला आहे. टी-२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या संघाची घोषणा केल्यानंतर काही तासातच पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित आणखी एक मोठी बातमी पुढे आली आहे.
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दुजोरा दिला आहे. मिसबाह आणि वकार यांना २०१९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. पीसीबीच्या करारानुसार त्यांच्या कार्यकाळाला अजून एक वर्ष शिल्लक होते, पण आता या दोघांनीही राजीनामा दिल्याने पीसीबीने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक यांच्याकडे संघाची कमान सोपवली आहे.

मिसबाहने यासाठी घेतला निर्णय
मिसबाह-उल-हकने आपल्या पदाचा राजीनामा देण्यामागच्या निर्णयाबद्दल सांगितले की, आता मला बहुतेक वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. वेस्ट इंडीजमधील मालिका संपल्यानंतर, जेव्हा मला कोरोना प्रोटोकॉलमुळे जमैकामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते, तेव्हा मला माझ्या गेल्या २ वर्षांचा आलेख पाहण्याची संधी मिळाली. ते पाहिल्यानंतर आता मी माझ्या कुटुंबालाही वेळ द्यायला हवा, असे ठरवले. मी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडण्यामागे हे एक मोठे कारण आहे.

मिसबाह पुढे म्हणाला की, “माझ्या निर्णयासाठी ही योग्य वेळ होती. गेली २ वर्षे खूप मजेत गेली. यासाठी मी सर्व टीम आणि व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो. आगामी क्रिकेट मालिका आणि टी-२० विश्वचषकासाठी मी पाकिस्तान संघाला शुभेच्छा देतो.

वकार यांनीही दिला गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा
दुसरीकडे, वकार युनूस यांनीही त्यांच्या भविष्यातील योजनांसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला. वकार म्हणाले की, “पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांसोबत काम करताना मजा आली. त्यांच्याकडे खूप क्षमता आहे. गेल्या १६ महिन्यांपासून जैव-सुरक्षित वातावरणात राहणे, हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता, जो मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीत अनुभवला नव्हता.

दरम्यान, मिसबाह आणि वकार यांनी राजीनामा दिल्यानंतर तात्पुरत्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, पण लवकरच पीसीबी नवीन व्यवस्थापनाची घोषणा करेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: