राज्यात पुन्हा पाऊसजोर; ‘या’ दोन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट


– नाशिकसह मुंबई, ठाण्यात मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट

– गणपतीचे स्वागत राज्यात धुवांधार पावसाने होण्याचा अंदाज

– विदर्भातील पाण्याची चिंता थोड्या प्रमाणात मिटण्याची अपेक्षा

विदर्भ, मराठवाड्याला पाऊसदिलासा?

मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे सोमवारी; तर औरंगाबाद, जालना येथे मंगळवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा येथील पावसाचा जोर शनिवारपासूनच वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील जिल्ह्यांना पाऊसदिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः
येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज, रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये; तर मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर येथेही पुढील आठवड्यात ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. याची सुरुवात शनिवारी संध्याकाळपासून झाली. दिवसभर रिपरिपणाऱ्या पावसाचा वेग शनिवारी संध्याकाळी वाढला. शनिवारी ठाणे, डोंबिवली येथे काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. मुंबईत एखाद-दुसऱ्या ठिकाणी पावसाचा जोर होता. शनिवारी मुंबईमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे ७.२ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे ८.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याचेही निरीक्षण नागरिकांनी नोंदवले. शनिवारी सर्वदूर पावसाचा जोर नसला तरी गणपतीच्या आधी हा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कोकणातही फारसा पाऊस नव्हता. मात्र आज, रविवारपासून दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकेल; तर मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढेल.

घाट परिसराला मंगळवारी तडाखा

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवारपासून मंगळवारपर्यंत, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवारपासून बुधवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट आहे. रायगडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतीतीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल; तर मुंबई, ठाणे येथे काही ठिकाणी मंगळवारी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात मंगळवारी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. पुणे आणि साताऱ्यात बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

कोकणात सरासरीहून १२ टक्के अधिक

मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा तीन टक्के पाऊस अधिक आहे. मराठवाड्यात १७ टक्के अधिक, तर विदर्भात मात्र १४ टक्के तूट आहे. कोकण-गोवा या हवामान विभागाच्या उपशाखेमध्ये १२ टक्के पाऊस सरासरीहून अधिक नोंदला गेला आहे. मात्र नंदुरबारसारखा जिल्ह्यात पावसाची ४३ टक्के तूट आहे. विदर्भात अमरावती येथे २६ टक्के, गडचिरोली येथे २५ टक्के आणि गोंदिया येथे २७ टक्के पावसाची तूट आहे. ही तूट या पावसाने भरून काढण्यासाठी मदत झाली तर पाण्याची चिंता थोड्या प्रमाणात मिटू शकेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: