फडणवीसांच्या कामगिरीबाबत केलेला ‘तो’ दावा खोडून काढत काँग्रेसचा हल्लाबोल


हायलाइट्स:

  • काँग्रेसचा भाजपवर पलटवार
  • उद्योगस्नेही मानकाबाबत केलेला दावा काढला खोडून
  • फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकालाबाबत केलेला दावा खोडून काढत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाजपा नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, असंही सावंत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही ( Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता, हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद असून वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर २०१८ साली १३ व्या स्थानावर होता. करोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल यात भाजपा तरबेज असून भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दीक्षा घेऊन बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी आहेत,’ असा घणाघात सचिन सावंत यांनी केला.

राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; जयंत पाटील म्हणाले…

काय आहे काँग्रेसचं म्हणणं?

‘ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा जीएसटी उत्पन्नात ३७२८ कोटी रुपयांनी घट झाली आहे, असं दुसरं धादांत खोटे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केलं आहे. प्रत्यक्षात एप्रिलमध्ये राज्याचा जीएसटी १२३५० कोटी रुपये, मे महिन्यात ७९८३ कोटी रुपये, जूनमध्ये ८३४९ कोटी रुपये, जुलैमध्ये ११३८८ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये १२६४४ कोटी रुपये असून या कालावधीत एकूण ५२७१४ कोटी रुपये उत्पन्न झालेलं आहे. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात जीएसटी उत्पन्न वाढलं आहे. त्यामुळे भातखळकर खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होतं,’ असा आरोप सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या करोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते त्यात या वर्षी ६७.२९ टक्के वाढ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत असतात. हे सरकार सत्तेवर आल्यापासून करोनासह नैसर्गिक संकटांचा सामना सातत्याने करत असतानाही राज्याच्या विकासाची गती थांबू दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारवर जनतेसह उद्योग क्षेत्राचाही विश्वास आहे,’ असंही काँग्रेसच्या सचिन सावंत यांचं म्हणणं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: