पाहा नेमकं घडलं तरी काय…पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी दोन षटकांमध्ये २२ धावांची गरज होती. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहिन आफ्रिदीच्या हातात चेंडू सोपवला आणि या षटकातच सामना संपल्याचे पाहायला मिळाले. कारण या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू वेडने सलग तीन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण याच षटकात एक मोठी चुक घडली आणि तीच पाकिस्तानचा चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा झेल हसन अलीने सोडला. त्यावेळी वेड हा २१ धावांवर होता. पण हे जीवदान मिळाल्याचा चांगलाच फायदा वेडने उचलला आणि त्याने त्यानंतर सलग तीन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला तिसऱ्याच चेंडूवर बाद केले, फिंचला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पाकिस्ताननने मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ यांनाही बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा एकहाती सामना लढवत होता, पण वॉर्नरला शादाब खानने बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३० चेंंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली, वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलही सात धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी पराभवाची घंटा वाजली होती. पण त्यानंतर स्टॉइनिस आणि वेड यांनी धमाकेदार फटकेबाजी केली आणि संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.