मुंबई: खंडणीखोरी व अन्यायाच्या विरोधात मी सुरू केलेल्या लढाईत संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे (
Uddhav Thackeray) यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आहे,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
नवाब मलिक (
Nawab Malik) यांनी आज स्पष्ट केलं. त्याचबरोबर, शरद पवारसाहेब सुद्धा माझ्या पाठीशी आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या सध्याच्या लढाईचा उल्लेख करत ‘मलिक, गुड गोइंग’ असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी मलिक यांना दिलेल्या शाबासकीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याबाबत विचारलं असता मलिक यांनी त्यास दुजोरा दिला. ‘मंत्रिमंडळ जसं माझ्या पाठिशी आहे, तसंच आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी आहे, असंही त्यांनी सांगितलं. ‘माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही,’ असंही त्यांनी ठणकावलं.
वाचा: लेखी माफी मागा, नाहीतर… निलोफर मलिक यांची फडणवीसांना कडक शब्दांत नोटीस
भारतीय जनता पक्षानं कालपासून नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलनं सुरू केली आहेत. त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. याबाबत विचारलं असता, माझे कितीही पुतळे जाळले तरी मी त्यांना आरसा दाखवत राहणार. आरसा दाखवल्यावर इतकं का घाबरताय?,’ असा सवालही त्यांनी केला.
भाजपवाले माणसाला माणूसही समजत नाहीत!
देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवर मला एका प्राण्याची उपमा दिली होती. ‘भाजपचे नेते नेहमीच इतरांना प्राण्यांची नावं देत असतात. कोणाला साप, मांजर, विंचू म्हणतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला प्राण्याची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. पण अशामुळं आमची इज्जत जात नाही, उलट भाजपची काय मानसिकता आहे हे दिसतं, असा बोचरा टोला मलिक यांनी हाणला.
वाचा: गुजरातमध्ये ३५० कोटींचं ड्रग्ज जप्त; नवाब मलिक म्हणाले, आता…