CPL 2020 : शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मिळवला रोमांचक विजय


वॉर्नर पार्क, सेंट किट्स : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. झटपट क्रिकेटची म्हणजे ट्वेंटी-२० ची चर्चा होते, तेव्हा विजय आणि पराभवाचा अंदाज लावणे कठीण असते. सामना कधी कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही. असंच काहीसं कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्स आणि सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिसलं. या सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत चालू होता. क्रिकेट चाहत्यांना ज्या प्रकारचे सामने बघायला आवडतात, तसा हा सामना झाला. दोन्ही संघांमधील या रोमांचकारी सामन्याचा नायक ठरला शेल्डन कॉट्रेल. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल केली आणि संघाला सामना जिंकून दिला.

वाचा- अवनीनं रचला इतिहास; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं दुसरं पदक

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोस रॉयल्सने २० षटकांत ८ गडी गमावून १६० धावा केल्या. बार्बाडोससाठी स्मित पटेलने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याने फलंदाजीच्या ७१ मिनिटांत ४८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. यानंतर सलामीवीर जॉन्सन चार्ल्स ३० धावा करून संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सेंट किट्ससाठी त्याचा कर्णधार ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २६ धावा देऊन ४ फलंदाजांना बाद केले. ब्राव्हो व्यतिरिक्त मिकेनने २ तर शेल्डन कॉट्रेलने १ बळी घेतला.

शेवटच्या षटकाचा असा रंगला थरार
सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्ससमोर १६१ धावांचे लक्ष्य होते, पण या ध्येयाचा पाठलाग करताना सेंट किट्सचा संघ विजय आणि पराभवाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला. सामना रोमांचक झाला. शेवटच्या षटकात सेंट किट्सला विजयासाठी ९ धावा हव्या होत्या. नर्स गोलंदाजी करत होता तर कॉट्रेल फलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवर कॉट्रेलने एक धाव घेत डेरेक्सला स्ट्राइक दिला. डेरेक्सने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला, पण चौथ्या चेंडूवर नर्सने डेरेक्सची विकेट घेतली. पाचव्या चेंडूवर डेरेक्सच्या जागी फलंदाजीसाठी आलेल्या नसीम शाहने एकेरी धाव घेतली. आता शेल्डन कॉट्रेल पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर होता आणि संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती. शेल्डनने शेवटचा चेंडू जोरदार टोलावत षटकार ठोकला आणि त्याच्या संघाने सामना जिंकला.

कॉट्रेलने ७ चेंडूत संपवला खेळ
सेंट किट्सने २० षटकांत ८ गडी गमावून १६३ धावा केल्या आणि २ गडी राखून सामना जिंकला. गोलंदाजीत १ विकेट घेणाऱ्या शेल्डन कॉट्रेलने अवघ्या ७ चेंडूत नाबाद २० धावा केल्या, ज्यात १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: