‘करोना गेला’ असं समजून वागणाऱ्यांना अजित पवारांचा कडक शब्दांत इशारा


हायलाइट्स:

  • राज्याच्या ग्रामीण भागांत करोना रुग्णांची वाढ
  • अजित पवार यांनी सांगितलं रुग्णवाढीमागचं कारण
  • नियम पाळण्याचं जनतेला केलं आवाहन

पुणे:करोना वगैरे सगळं संपलंय असा गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतला आहे. मुख्यमंत्री वारंवार आवाहन करत असतात तरी लोक ऐकत नाहीत. त्यातही राजकारण केलं जातं. असं करून पुन्हा सगळं काही बंद करण्याची वेळ सरकारवर आणू नका,’ असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. (Ajit Pawar on Corona Cases)

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकडं पत्रकारांनी अजित पवारांचं लक्ष वेधलं. अजित पवारांनीही ते मान्य केलं. ‘करोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत केरळनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे केंद्र सरकारनंही सांगितलंय. त्यांनीही काळजी घ्यायला सांगितलं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांना भीतीच राहिलेली नाही. मास्क घातले जात नाहीत. शारीरिक अंतर पाळलं जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही नियम पाळायला हवेत, ते पाळले जात नाहीत. करोना गेलाय अशा प्रकारचा एक गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतलाय. त्यामुळं ही संख्या वाढलीय,’ असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा:

‘भाजपचं ते आक्रमक महिला मंडळ आता कुठं बसलंय?’स्टिंग ऑपरेशन करणं काँगेस नेत्याच्या अंगलट; विनयभंगाचा गुन्हा दाखल

निर्बंध झुगारून सण-उत्सव साजरे करण्याचा हट्ट धरणाऱ्या राजकीय पक्षांवरही त्यांनी टीका केली. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, काही लोक त्यात राजकारण करतात. काही जण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वत:चं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार आहे. त्यासाठी भावनिक मुद्दे उचलून काही साध्या होतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तिसरी लाट आल्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या…’ म्हणत सगळंच बंद करण्याची वेळ सरकारवर आणू नका,’ असा इशारा त्यांनी दिला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram