इंधनाच्या डिजिटल पेमेंटवरील कॅशबॅक बंद; ग्राहकांमध्ये नाराजी


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवरील सवलत हळूहळू कमी करत बंद केल्यानंतर आता डिजिटल माध्यमांतून इंधनखरेदीवर मिळणारी कॅशबॅकही बंद केली आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोलियम कंपन्यांकडून डेबिट कार्ड, यूपीआय तसेच वॉलेटच्या माध्यमातून इंधन खरेदी करणाऱ्यांना ०.७५ टक्के रकमेचा परतावा देण्यात येत होता. परंतु, आता ही ‘कॅशबॅक’ही पेट्रोलियम कंपन्यांनी बंद केली आहे.

नोटाबंदीनंतर व्यवहारांत रोख रकमेचा वापर कमी व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याअंतर्गत १३ डिसेंबर २०१६ रोजी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ०.७५ टक्के रकमेचा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. व्हिसा, मास्टर कार्ड नेटवर्कवरुन वितरीत करण्यात आलेले डेबिट कार्ड, रुपे नेटवर्कचे डेबिट कार्ड, यूपीआय आणि वॉलेट या प्लॅटफॉर्मवरून इंधन खरेदी केल्यास ही कॅशबॅक देण्यात येत होती. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरून इंधन भरताना ग्राहक डेबिट कार्ड, यूपीआय प्रणाली किंवा वॉलेटचा वापर करीत होते. परंतु, आता पेट्रोलियम कंपन्यांनी ही सवलतही काढून घेतली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी व्हिसा, मास्टर कार्ड किंवा इतर कुठल्याही नेटवर्कच्या डेबिट कार्डांसाठी ही सवलत रद्द केली आहे. वॉलेट व्यवहारांवरही ही सवलत मिळणार नाही. फक्त रुपे कंपनीचे डेबिट कार्ड आणि यूपीआय व्यवहारांवरच आता ही सवलत लागू राहणार आहे. आधीच इंधनदरवाढीमुळे पोळलेल्या ग्राहकांची ही कॅशबॅक सवलतही बंद केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चलनात रोकड वाढणार

बाजारात रोकड जास्त आल्यामुळे काळा पैसा वाढत असल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली होती. त्यानंतर देशात अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण झाले. त्याचाही वापर नागरिकांकडून वाढला. पेट्रोल पंपावर कॅशबॅक मिळत असल्याने अनेक ग्राहक डिजिटल पर्यायांचा अवलंब करीत होते. परंतु, ही सवलत बंद झाल्यामुळे पेट्रोल पंपांवर पुन्हा रोकड व्यवहार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या डिजिटल इंडिया या मोहीमेवर परिणाम होऊ शकतो, असे ग्राहकांचे मत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने कमी केले असले तरी अद्याप ते खूप जास्त आहेत. डिजिटल पेमेंटवरील कॅशबॅकच्या माध्यमातून थोडासा दिलासा मिळत होता. तोही आता सरकारने काढून घेतला आहे. त्यामुळे रोख इंधनखरेदी वाढू शकेल.

-मनोज पवार, ग्राहक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: