चौथ्या सामन्यात काळी पट्टी बांधून का टीम इंडिया उतरली मैदानात; जाणून घ्या कारण…


INDvsENG : द ओवल : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर जेव्हा भारतीय संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आला, तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूने त्यांच्या डाव्या हातावर काळी पट्टी बांधलेली दिसली.
मुंबईचे माजी क्रिकेटपटू वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ही काळी पट्टी बांधली आहे. सोमवारी (३० ऑगस्ट) वासुदेव यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. बीसीसीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संघाचा फोटो ट्विट करताना बीसीसीआयने म्हटलं आहे की, “वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आज त्यांच्या हातावर काळ्या फिती लावून मैदानात उतरले.”

वासू यांनी दिग्गजांना दिले क्रिकेटचे धडे
वासू यांची गणना देशातील सुप्रसिद्ध प्रशिक्षकांमध्ये होते. त्यांनी अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले आहे. या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच रोहितने सांगितले होते की, त्याच्या यशात वासू परांजपे यांचे मोठे योगदान आहे. “मी अजूनही वासू सरांच्या संदेशाची वाट पाहतो. मला माहित आहे की, संधी मिळेल तेव्हा वासू सर माझे सामने बघत असतील. त्यांची कोणतीही छोटी सूचना खूप मौल्यवान असते. प्रत्येक खेळीनंतर मी त्यांचा सल्ला ऐकण्यास उत्सुक असतो.”

वासुदेव यांनी १९५६ ते १९७० दरम्यान, मुंबई आणि बडोद्यासाठी २९ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. या दरम्यान त्यांनी २३.७८ च्या सरासरीने ७८५ धावा केल्या. तसेच ९ विकेटही घेतल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते दादर युनियनकडून खेळत असत. हा संघ सर्वात तगड्या संघांपैकी एक होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर वासू परांजपेंनी प्रशिक्षणाकडे मोर्चा वळवला.

भारताने केले दोन बदल
भारताने चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या जागी युवा शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर उमेश यादवचा बऱ्याच काळानंतर संघात समावेश करण्यात आला आहे. उमेशने आपला शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०२० मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: