डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या मोइन अलीने संघाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकांमध्ये मोईनने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या सामन्यात मोइनने इंग्लंडसाठी सर्वाधिक धावाही केल्या.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी सुरुवातील चांगला मारा केला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये इंग्लंडला मोठे फटकेबाजी करण्यापासून रोखले. टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांपेक्षा अॅडम मिल्ने हा जास्त प्रभावी ठरल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यसमनने यावेळी फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांवर जास्त भर दिल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर त्यांनी भारतावर विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंडने एकामागून एक विजय मिळवत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील २०१९ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या मनात ताज्या असल्याचे पाहायला मिळाले. कारण चाहत्यांनी सोशल मीडियावर या सामन्याचे फोटो आणि आठवणी पोस्ट केल्या.