कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज – मुख्याधिकारी अरविंद माळी

स्वच्छतेसाठी 1340 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
   पंढरपूर/नागेश आदापूरे,दि.10/11/2021 :- कार्तिक शुद्ध एकादशी 15 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असून कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील इतर जिल्ह्यासह परराज्या तून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रा कालावधीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

 कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र वाळवंट ,65 एकर परिसर ,पत्रा शेड आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1340  स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 340 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.शहरासह 65 एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतूनाशक फवारणीसह मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पत्राशेड,वाळवंट 65 एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात आली आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

 शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीचे काम सुरु असून काही ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत.65 एकर येथे अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी सात हायमास्ट दिवे चालू करण्यात आले आहेत.  सार्वजनिक शौचलयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे. नदीपात्र येथे 20 मीटर उंचीचे 9 हायमास्ट दिवे चालू केले असून सर्व घाटांवर , पत्राशेड व वाहनतळ येथेही लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.

     सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व  वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आली आहेत. मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असल्याचे श्री.माळी यांनी सांगितले.   

यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहावे यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: