हायलाइट्स:
- ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवर हायकोर्टात झाली सुनावणी
- दोन्ही बाजूच्या पक्षकारांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
- नवाब मलिक यांना हायकोर्टानं केला महत्त्वाचा प्रश्न
‘नवाब मलिक हे आमच्या कुटुंबीयांवर निराधार आरोप करत आहेत. त्यामुळं आमची प्रतिमा मलीन झाली आहे. सोशल मीडियात आमच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया येत आहेत. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत’, असा आरोप करत, ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर दिवाळी सुट्टीकालीन कोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना आपापली बाजू स्पष्ट करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
कोर्ट काय म्हणाले?
‘नवाब मलिक हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी जे काही ट्विट्स केले, त्याविषयीच्या कागदपत्रांची सत्यता आधी तपासून घेतली होती का? कारण सरकारी सेवक असलेल्या समीर वानखेडे यांच्याविषयी ते व्यक्तिगत काही बोलत असतील तर ते त्यांचे वडील म्हणून ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. समीर वानखेडे हे सरकारी सेवक असल्यानं त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही अशी बंदी घालण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही. मात्र, इतर सर्व गोष्टींविषयी बोलताना मलिक यांनी कागदपत्रांची सत्यता आधी तपासली होती का, हे कोर्टाला पहायचं आहे,’ असं खंडपीठानं नमूद केलं. ‘समीर वानखेडे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अनेक ट्विट करताना ज्या कागदपत्रांचा तुम्ही आधार घेतला, त्यांच्या सत्यतेविषयी खातरजमा करून तुम्ही त्यांचा वापर केला, असं सांगणारं प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा,’ असे निर्देश न्यायालयानं मलिक यांना दिले.
ज्ञानदेव वानखेडेंनाही निर्देश
‘नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स खोटे असतील तर तसे स्पष्ट करणारं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा,’ अशा सूचना न्यायालयानं ज्ञानदेव वानखेडे यांना दिल्या आहेत.
वाचा: ‘दाऊदशी संबंध असलेला रियाझ भाटी फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा?’
वाचा: कोल्हापुरात खळबळ; सरकारवर आरोप करत एसटी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न