हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी मंजम्मा जोगती यांनी केलेल्या अभिवादनाची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंजम्मा यांनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. राष्ट्रपतींनीही हसत हे अभिवादन स्वीकार केलं. त्यांचा हा अंदाज पाहून संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला.
कोण आहेत मंजम्मा जोगती?
मंजम्मा जोगती यांचा जन्म १८ एप्रिल १९६४ रोजी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील कल्लुकंब गावात झाला होता. त्यांचं खरं नाव मंजूनाथ शेट्टी असं होतं. त्या कलाक्षेत्राशी निगडीत आहेत.
कन्नड रंगमंचावर मंजम्मा जोगती यांना अभिनेत्री, गायिका आणि नृत्यांगणा म्हणून ओळखलं जातं.
नृत्य कला क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानासाठी भारत सरकारनं ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.
२००६ साली ‘कर्नाटक जनपद अकादमी’ पुरस्कारानंही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तर २०१९ साली कर्नाटकच्या त्या ‘कर्नाटक जनपद अकादमी’च्या पहिल्या ट्रान्सजेन्डर अध्यक्ष बनल्या. याशिवाय २०१० साली कर्नाटक सरकारनं त्यांना वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारासहीत सन्मानित केलं.
देवी यल्लम्माशी विवाह
मंजम्मा उर्फ मंजूनाथ यांनी शाळेत जाणं सुरू केलं तेव्हा त्यांना मुलींसोबत खेळण्याची आणि नृत्याची आवड होती. कुटुंबीयांनी डॉक्टर आणि पुजाऱ्यांना दाखवल्यानंतर मंजूनाथ यांचं शरीर पुरुषाचं असलं तरी त्यांच्यात स्त्रीचे गुण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर, १९७५ मध्ये त्यांचे आई-वडील त्यांना हुलीगेयम्मा मंदिरात घेऊन गेले. इथे ‘जोगप्पा’ बनण्याची दीक्षा दिली जाते. ‘जोगप्पा’ किंवा ‘जोगती’ चा यल्लम्मा देवीशी विवाह लावण्यात येतो. आपलं संपूर्ण आयुष्य यल्लम्मा देवीचे भक्त म्हणून ते सेवा करतात. यल्लमा देवीला उत्तर भारतात रेणुका नावानंही ओळखलं जातं.
जोगती म्हणून जगण्याची जबरदस्ती
दीक्षा घेण्यासाठी आणि देवी यल्लम्माशी विवाह करण्यासाठी मंजूनाथ यांना मंगळसूत्र, स्कर्ट-ब्लाऊज आणि बांगड्या देण्यात आलं. त्यानंतर मंजूनाथ यांना मंजम्मा जोगती असं नाव मिळालं.
विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
आई-वडिलांनी आपल्या मंजूनाथला देवीला सोडून दिलं होतं. बेघर झाल्यानंतर राहण्या-खाण्यासाठी कोणतीही जागा मंजम्मांकडे नव्हती. त्यामुळे त्यांना भीक मागून आपला उदरनिर्वाह करावा लागला. आई-वडील मुलगा गमावण्याच्या दु:खात होते. यातच, निराशेच्या गर्तेत बुडालेल्या मंजम्मा यांनी विष घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु, वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं त्यांचा जीव वाचला.
सामूहिक बलात्कार
यानंतर, मंजम्मा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान सहा जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचंही मंजम्मा यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना सांगितलंय. भीक मागून जमा केलेले पैसेही या नराधमांनी लुबाडले.
जोगती नृत्य आणि जगण्याचा संघर्ष
कर्नाटकच्या दावणगेरे बस स्टँडजवळ रस्त्यावर ‘जोगती नृत्य’ करत फिरणाऱ्या एका बाप-मुलाची जोडी पाहून आत्महत्येचा विचार मंजम्मा यांनी परतवून लावला. या मुलानं स्टीलचे मोठमोठे घडे आपल्या डोक्यावर ठेवून आपली कलाही लोकांसमोर सादर केली. याच व्यक्तीकडून मंजम्मा यांनी नृत्याचे धडे घेतले.
याच दरम्यान त्यांची लोक कलाकार कालव्वा यांच्याशी भेट झाली. कालव्वा यांच्यामुळे मंजम्मा यांना छोट्या-मोठ्या नाटकांत भूमिकाही मिळू लागल्या. यानंतर त्यांनी रंगमंच आणि नृत्यालाच आपलं आयुष्य समर्पित केलं. ‘रस्त्यावर भीक मागणं किंवा सेक्स वर्कर म्हणून काम करणं निवडलं असतं तर आज मी जिवंत नसते. जोगती नृत्यानंच मला इथवर आणलंय. हे नृत्य आणि जोगप्पा समाजाला मानाचं स्थान मिळावं’ यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंजम्मा यांनी म्हटलंय.
‘जोगती नृत्य’ हे पारंपरिक लोकनृत्य म्हणून ओळखलं जातं. ट्रान्सजेन्डर महिला हे नृत्य सादर करतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांत हे नृत्य परिचित आहे. त्यामुळेच, या राज्यांतल्या अनेक ग्रामीण भागांत मंजम्मा आणि त्यांचं नृत्य लोकप्रिय आहे.
एकूण ११९ मान्यवरांचा गौरव
मंगळवारी एकूण ११९ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यात सात मान्यवरांना ‘पद्म विभूषण’, १० मान्यवरांना ‘पद्मभूषण’ आणि १०२ जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरविण्यात आलं तर १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.