मलाला युसुफजई ही सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणारी सामाजिक कार्यकर्ता ठरली होती. आपल्या घरीच छोटेखानी सोहळ्यात विवाह समारंभ पार पडल्याचं मलालानं म्हटलंय.
‘आज माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. असर आणि मी विवाहबंधनात अडकलो आहोत. आम्ही आमच्या कुटुंबासोबत बर्मिंघममध्येच आपल्या घरी साजरा केला. तुमच्या शुभेच्छा असू द्या. पुढच्या प्रवासात सोबत चालण्यासाठी आम्ही उत्साही आहोत’, असं मलालानं सोशल मीडियावर म्हटलंय. सोबतच, पती असरसोबतचे काही फोटोही मलालानं शेअर केले आहेत.
मलाला युसुफजई हिचा जन्म पाकिस्तानात झाला होता. आपल्या वडिलांसोबत पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये समोरून गोळीबार केला होता. त्यावेळी मलाला केवळ ११ वर्षांची होती. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालाची शाळेची बस अडवून हा हल्ला करण्यात आला होता. ब्रिटनमध्ये दीर्घकाळ उपचारानंतर मलालाच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानंतर इथूनच मलालानं आपलं कार्य सुरू ठेवलं.