Sanatan Sanstha: दाऊदच्या घराबाबत मलिक यांचा आरोप; ‘सनातन’ने तातडीने दिले हे स्पष्टीकरण


हायलाइट्स:

  • दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.
  • सनातन संस्थेने मंत्री नवाब मलिक यांचा आरोप फेटाळून लावला.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा मलिकांचा प्रयत्न.

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांचा आरोप फेटाळताना मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा सनातन संस्थेशी संबंध जोडला होता. त्यावर सनातन संस्थेने लगेचच स्पष्टीकरण दिले असून दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही, असे नमूद केले आहे. ( Sanatan Sanstha On Nawab Malik )

वाचा: ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना तो अंडरवर्ल्ड डॉन…’; मलिक यांचा धमाका

सनातन संस्थेने मलिक यांचा आरोप फेटाळत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ‘मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून, प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही’, असे सनातनने म्हटले आहे.

वाचा:मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार!; मलिक यांनी फडणवीसांना ललकारले

‘नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मलिक यांच्यावर दहशतवादी कारवाया करणाऱ्यांकडून जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे श्रीवास्तव यांनीही ती जमीन दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे. त्यामुळे असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल’, असा इशाराही सनातनने दिला आहे. पुरेशी माहिती न घेता सनातन संस्थेसंदर्भात मलिक यांनी केलेले आरोप हास्यास्पद असून मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, अशी अपेक्षाही सनातनने व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते मलिक?

‘मी किंवा माझ्या कुटुंबाने कुठलीही जमीन अंडरवर्ल्डच्या दबावाखाली किंवा कोणावर दबाव आणून घेतलेली नाही. हसीना पारकरला मी ओळखतही नाही. असा कोणाचाही कुणाशी संबंध जोडायचा झाला तर दाऊद इब्राहिम कासकरचं कोकणातलं घर सनातन संस्थेनं घेतलं आहे. मग सनातनचा दाऊदशी किंवा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा सवाल नवाब मलिक यांनी फडणवीस यांना केला होता. त्यावरूनच सनातनने स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा: ‘असे’ आहेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी कागदपत्रेच आणलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: