‘तुमचा पती जिवंत आहे’; अंत्यसंस्कार केल्यानंतर रुग्णालयातून आला फोन!


हायलाइट्स:

  • पतीचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर केले अंत्यसंस्कार
  • मात्र पती जिवंत असल्याचं २ दिवसांनंतर रुग्णालयाने कळवलं
  • विचित्र घटनेनं जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर : नातेवाईकाचा मृतदेह समजून अतिशय दु:खात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसंच रक्षाविसर्जनही झाले. पण अचानक सरकारी रूग्णालयातून ‘तुमचा पेशंट शुद्धीवर आला आहे, त्याला घेऊन जा’ असं सांगणारा फोन आला आणि रुग्णालयात जाऊन पाहताच तो त्यांचाच नातेवाईक निघाला अन् ते ही जिवंत. मग अंत्यसंस्कार कुणावर केले या प्रश्नाने नातेवाईकांसह आता पोलीसही चक्रावले आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील या घटनेने पोलीस आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर झोपडपट्टीत विजापूर जिल्ह्यातील अनेक कुटुंब राहतात. येथे राहणाऱ्या आणि मोलमजुरी करणाऱ्या नारायण सदाशिव तुदिगल (३५) या तरूणास क्षयरोग झाल्याने त्याला उपचारासाठी सावित्रीबाई फुले रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात त्याच्यावर काही दिवस उपचार सुरू होते.

Sameer Wankhe: वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार; मलिक यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

रविवारी दुपारी रूग्णालयातून तुदिगल यांच्या नातेवाईकाना फोन आला. ‘तुमचा रूग्ण दगावला असून ओळख पटवून मृतदेह घेऊन जा’ असं कर्मचाऱ्यानं सांगितलं. त्यानुसार त्याच्या पत्नीसह काही नातेवाईक रूग्णालयात गेले. पतीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पत्नीने तिथेच हंबरडा फोडत दाखवलेला मृतदेह पतीचा असल्याचं सांगितलं. व्यवस्थित मृतदेह न पाहताच तिने हंबरडा फोडला आणि तिची मानसिकता पाहून तिचाच पती असेल, असं समजून पुढील प्रक्रिया करण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कुटुंबासह शेतात काम करणाऱ्या महिलेवर अचानक बिबट्याने केला हल्ला

मृतदेह घरी आणून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी रक्षाविसर्जनही करण्यात आले. त्यासाठी विविध गावाहून नातेवाईकही जमा झाले. सारे दु:खात असतानाच दुपारी अचानक रूग्णालयातून दुसरा फोन आला. ‘तुमचा रूग्ण शुद्धीवर आला आहे, त्याला घेऊन जा’ असा निरोप आला. या फोनने नातेवाईक एकदम अवाक् झाले. त्यांनी तातडीने रूग्णालय गाठले.

रूग्णालयात जिवंत पतीला पाहून पत्नीला धक्काच बसला. पतीचा मृत्यू झाल्याचं समजून दोन दिवस ती हंबरडा फोडत होती. पण, तिचा पती जिवंत असल्याचा पुरावाच तिला मिळाला. मग, तेथून दुसरी कहाणी सुरू झाली. ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो मृतदेह कुणाचा? अंत्यसंस्कार झालेला मृतदेह एका बेवारस व्यक्तीचा असल्याचं समजतं. पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या घोळामुळे बेवारस मृतदेह तुदिगल यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसही आता चक्रावून गेले आहेत. हा घोळ नेमका कसा झाला याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.

‘पोलिसांनी सर्व कागदपत्रे तयार करून दिली. त्या कागदपत्रानुसार रूग्णालयाने मृतदेह दिला. हा घोळ पोलिसांनी घातल्याने अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले आहेत. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे,’ असं रा. शाहू वैद्यकीय कॉलेजचे डीन प्रदीप दीक्षित यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: