हायलाइट्स:
- अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी चौघांना अटक.
- चौघांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तिघा परिचारिकांचा समावेश आहे.
- त्यांना आरोग्य विभागाने कालच निलंबित केलेले आहे.
वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश कालच आरोग्य विभागाने दिला आहे. त्यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. यांच्यासोबत निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि अन्य एका वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे परिचारिका संघटनेतर्फे संताप व्यक्त करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या
गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात आग लागली होती. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला होता. अज्ञात आरोपींविरूदध हा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कालच नगरला भेट देऊन सखोल चौकशी केली होती. मधल्या काळात आरोग्य विभागाकडूनही मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यात नावे निष्पन्न झाल्याने मंगळवारी सायंकाळी यातील चौघांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या घटनेचा तपास करीत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- जळगावात नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; ‘हे’ कारण
पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत गेले होते. त्याची पडताळणी यासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, मृत आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यातून नावे निष्पन्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
निलंबनाच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटनेतर्फे सकाळीच आंदोलन करण्यात आले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने संघटनेने यावर संताप व्यक्त केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ईडी,सीबीआय की एनआयए?; फडणवीस मलिकांविरोधातले पुरावे कोणाला देणार?