हायलाइट्स:
- खुद्द भाजप मंत्री ठरले फसवणुकीचे बळी
- मुकेश पटेल गुजरातचे पेट्रोकेमिकल मंत्री
- ताफ्याविना गाडीत डिझेल भरण्यासाठी दाखल झाले होते मंत्री महोदय
पेट्रोल पंपावर फसवणुकीचा बळी ठरलेत खुद्द गुजरातचे पेट्रोकेमिकल मंत्री मुकेश पटेल… आपली फसवणूक होत असल्याचं दिसताच मंत्री महोदयांनी रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांना फोनाफोनी करून पेट्रोल पंपच सील करून टाकला.
सूरत शहरातील जहांगीरपूर भागात स्थित असेलल्या नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपाला सील ठोकण्यात आलंय. इथंच गुजरात सरकारचे ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे मंत्री मुकेश पटेल आपल्या ताफ्याविना एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या गाडीत डिझेल भरण्यासाठी दाखल झाले होते.
पटेल यांनी आपल्या गाडीत चार हजार रुपयांहून अधिक किंमतीचं डिझेल भरलं. परंतु, पंपाच्या मीटरवर आकडे मात्र स्पष्ट दिसत नव्हते. याचं कारण त्यांनी पंपावरच्या कर्मचाऱ्यांकडे मागितलं. यावेळी, पंपावरच्या कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांची ओळख पटलेली नव्हती.
पंपावरच्या कर्मचाऱ्यांकडून संतोषजनक उत्तर न मिळाल्यानं पटेल यांनी तातडीनं सूरतच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. त्यानंतर थोड्याच वेळात पुरवठा विभागाचे अधिकारी पंपावर दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पेट्रोल पंपावरच्या १२ नोझलपैंकी ६ नोझलला सील ठोकण्यात आलं. पेट्रोल पंपावरून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पटेल यांनी म्हटलंय. गुजरातच्या सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.
‘जनतेची लूट…’
दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारनं पेट्रोल – डिझेलच्या दरावर सूट देत जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं. अशा वेळी पेट्रोल पंप मालक जनतेची लूट करू शकणार नाहीत, अशी पुश्तीही त्यांनी यावेळी जोडली.
मुकेश पटेल हे सूरतच्या ओलपाड विधानसभा मतदारसंघाचे आमदारही आहेत. ते सूरतच्या जहांगीरपुराच्या याच पेट्रोल पंपाजवळच्या भागात राहतात.