…तर आग दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचला असता; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर


अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात आगीच्या वेळी नेमकं काय घडलं, याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. या आधारे आता तपास सुरू झाला असून यातून धक्कादायक निरीक्षणे पोलिसांनी नोंदवली आहेत. आग कशी लागली ही गोष्ट अद्याप अस्पष्ट असली तरी आगीनंतर मात्र कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पोलिसांना आढळून आला आहे. त्यांनी थोडा धोका पत्करला असता तर अनेकांचे जीव वाचले असते, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील आगीचा पोलीस तपासही वेगाने सुरू आहे. डॉ. शेखर यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तपास अधिकारी उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी तापसले. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्या आधारे घटनेची उकल करण्याचे काम सुरू आहे.

कोर्टाचा अवमान करून संप चिघळवणार असतील तर…; मंत्री अनिल परब यांचा ‘हा’ इशारा

काही मिनिटांची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यांनी थोडा धोका पत्करला असता तर अनेकांचे जीव वाचवता आले असते. सुरुवातीला छताच्या बाजूने धूर निघत असल्याचे दिसून आले. एकूण परिस्थिती पाहता रुग्णांना तत्काळ बाहेर काढण्यास बऱ्यापैकी संधी होती. काही रुग्णांचे नातेवाईक धावत येऊन आपल्या रुग्णांना घेऊन जाताना दिसले. एक रुग्ण तर स्वत: रांगत बाहेर येताना दिसून आला. मात्र, ज्यांची जबाबदारी होती, ते आरोग्य कर्मचारी बचाव कार्य करताना दिसून आले नाहीत. आता आम्ही संबंधितांचे जबाब नोंदवणार आहोत, काही कागदपत्रे मागवणार आहोत, त्याआधारे आरोपींची नावे निष्पन्न केले जातील,’ असंही डॉ. शेखर यांनी सांगितलं.

पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील आरोपी अद्याप निश्चित झालेले नाहीत. यासंबंधी डॉ. शेखर यांनी सांगितले की, ‘आम्ही आता पुराव्यांची जुळवाजुळव करत आहोत. जिल्हा रुग्णालयांकडून कागदपत्रे मागवली आहेत. घटनेच्यावेळी कोणाची ड्युटी कोठे होती, कोणाचे वर्तन कसे होते, कोणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी फॉरेन्सिक लॅबसह अन्य तज्ज्ञांचे अहवाल, कागदपत्रे यांचीही मदत घेण्यात येणार आहे. सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीची चौकशी सुरूच राहील. आमचा तपास दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. तपासाच जे जे निष्पन्न होत जाईल, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहितीही डॉ. शेखर यांनी दिली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: