जळगाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदारावर आरोप; गिरीश महाजन म्हणाले…


हायलाइट्स:

  • अजिंठा विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा
  • भाजप आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा महाजन यांचा आरोप
  • राष्ट्रवादीने केली चौकशीची मागणी

जळगाव : शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा रविवारपासून सोशल मीडियावर सुरू आहे. याप्रकरणी सोमवारी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी ही अफवा असल्याचं सांगत अशा अफवा पसरवून भाजप आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. तसंच या प्रकरणात तथ्य असेल तर त्याचा तपास करुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत सोमवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीवर भाजपने बहीष्कार टाकल्याने गिरीश महाजन जिल्हा बँकेत अर्ज माघारी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंजिठा विश्रामगृहात झालेल्या कथित प्रकरणाच्या चर्चेविषयी आपली भूमिका मांडली.

मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीचा गुन्हा; दोन पोलीस निरीक्षकांना अटक

यावेळी महाजन म्हणाले की, असं कुणाचंही नाव कसं घेतलं जाऊ शकते? सोशल मीडियातून हा विषय मी वाचतो आहे. हे अतिशय गंभीर आहे. विषयाला कुठलेही हातपाय नसताना अशी चर्चा होणे चुकीचं आहे. मी पोलिसांशी, एसपींशी बोललो पण ते म्हणतात कुठेच काहीही नाही आहे. सोशल मीडियावर ही एक अफवा होती. मग याचे नाव घ्या, त्याचे नाव घ्या, औरंगाबादचे कुणी आले, कुणी म्हणते पी.ए. आला, तर कुणी म्हणते आमदार आला. मला वाटते ही बातमी फेक आहे, चुकीची आहे आणि खरी असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. मात्र, विनाकारण कुणालाही बदनाम करायचे, कुणाचंही नाव सोशल मीडियावर टाकायचे हा प्रकार गंभीर आहे,’ असं महाजन यांनी म्हटलं आहे.

‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

‘जळगावातील अजिंठा विश्रामगृहात दोन दिवसांपूर्वी घृणास्पद प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. या प्रकाराची चर्चा रविवारपासून सोशल मीडियावर होत आहे. विशेष म्हणजे यात जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याचंही म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वंदना पाटील यांनी केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: