हायलाइट्स:
- ड्रग्ज प्रकरणी नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.
- ड्रग्जशी संबंधित लोकांना अटक करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार ते करत नाही- राणे
- पोलिसांना तुम्ही कलेक्शनला वापरता पण ड्रग्ज रोखण्यासाठी त्यांना का वापरत नाही?- राणेंचा सवाल.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांच्या राज भवन या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ड्रग्ज प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राणे म्हणाले की, ड्रग्ज या राज्यात यायलाच नको, या ड्रग्जमुळे भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. हे व्हायला नको म्हणून ड्रग्जवर कडक कारवाई करणे आणि ड्रग्जशी संबंधित लोकांना अटक करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार ते करत नाही आहे. आरोप प्रत्यारोप चाललेत, मात्र ड्रग्ज बंद करण्यासाठी आम्ही मोहीम सुरू करू, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत?, मुख्यमंत्र्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे आणि पोलिसांना कारवाई करायला लावायला पाहिजे. पोलिसांना तुम्ही कलेक्शनला वापरता पण ड्रग्ज रोखण्यासाठी त्यांना का वापरत नाही, असा सवाल राणे यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई; उचलले ‘हे’ कठोर पाऊल
अनिल परब कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य करताना राणे म्हणाले की, आतापर्यंत २० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणे म्हणजे पळवाट आहे. कामगारांना फसवण्याची ही समिती आहे. यात दुसरं काही नाही. या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही. अनिल परब हे कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत, अशा शब्दांत राणे यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला.
क्लिक करा आणि वाचा- कोर्टाचा अवमान करून संप चिघळवणार असतील तर…; मंत्री अनिल परब यांचा ‘हा’ इशारा
राज्यपालांशी काय बोललो हे सांगायचं नसतं- राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. यावर राज्यपालांशी आपली काय चर्चा झाली असा प्रश्न पत्रकारांनी राणे यांना विचारला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण भेटलो. मात्र, इतर विषयावर काय चर्चा झाली ती सांगायची नसते, असे सूचक विधानही राणे यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- दोन संशयितांनी अंबानींच्या ‘अँटिलिया’चा पत्ता विचारला; उडाली खळबळ, परिसरात नाकाबंदी