भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले असले तरी हा सामना त्यांच्यासाठी प्रयोग करण्याची ही सुवर्णसंधी असेल. कारण आजच्या सामन्यात भारताला विजय किंवा पराभवाचे कोणतेही दडपण नसणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आज बिचनधास्तपणे खेळू शकतील. त्यामुळेच आतापर्यंत विश्वचषकात ज्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही, त्यांना खेळवण्यात येणार का, हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. कारण भारताने विश्वचषकासाठी अव्वल १५ खेळाडूंची निवड केली होती, पण त्यामधील सर्वांनाच संधी मिळाली नाही. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ चांगले प्रयोग करू शकतो. त्याचबरोबर भविष्यात कोणते खेळाडू भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतील, हेदेखील पाहता येईल. कदाचित फलंदाजांचे स्थानही बदलण्यात येऊ शकते. एखादा खेळाडू आपल्या स्थानावर फलंदाजीला न येता दुसऱ्या स्थानावर कशी फलंदाजी करतो, हे या सामन्यातमध्ये पाहता येईल. त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत पोहोचू शकत नाही, यासाठी निराश न होता एक प्रयोग म्हणून या सामन्यांकडे पाहणे महत्वाचे आहे.
जर रविवारी न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला असता तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची नामी संधी होते. पण रविवारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या. टी-२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेली टीम इंडिया शेवटचा साखळी सामना खेळण्यासाठी दुबईच्या मैदानात उतरणार आहे. नामिबियाशी होणाऱ्या या सामन्यात मोठा विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाच इरादा असेल. दुसरीकडे, सुपर-१२ मध्ये पोहचून नामिबिया संघाने इतिहास रचला आहे. जरी त्यांच्या खात्यात एकही विजय नसला, तरी नामिबियाच्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहेत. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन-चार बदल होऊ शकतात. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी ईशान किशनला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. गोलंदाजीत ३ बदल होऊ शकतात, असे म्हटले जात होते.