हायलाइट्स:
- ज्ञानदेव वानखेडे यांचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा
- मुंबई उच्च न्यायालयानं मलिकांना दिले उत्तर दाखल करण्याचे निर्देश
- या प्रकरणावर बुधवारी होणार सुनावणी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे खंडणी वसुली करतात. त्यासाठी खोटी प्रकरणं उभी करतात. आर्यन खान, समीर खान यांच्यासह अन्य २६ प्रकरणांची यादीच मलिक यांनी जाहीर केली होती. ही सर्व प्रकरणे बोगस असून त्यातील साक्षीदार समीर वानखेडे यांच्या जवळचे आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. वानखेडे हे फ्रॉड असल्याचं सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी त्यांचा जन्मदाखला, पहिल्या निकाहाचे फोटो व वडिलांचं नाव आधी तपशीलही जाहीर केला होता. त्यामुळं चांगलीच खळबळ उडाली होती. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे, असंही त्यांनी जाहीर केलं होतं. त्यांनी खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला होता.
वाचा: आर्यन प्रकरणात शाहरुख खान दुहेरी चौकशीच्या कात्रीत; आता…
मलिक यांच्या या आरोपांमुळं गेल्या महिनाभरापासून वानखेडे कुटुंब मीडियात चर्चेत आहे. वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांचे आरोप फेटाळल्यानंतरही मलिक नवनव्या गोष्टी पुढं आणत आहेत. त्यामुळं संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ‘मलिक हे रोज नवे निराधार जाहीर आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळं आमची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियातून धमक्या मिळत आहे. आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी अर्जात म्हटलं आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढं आज हा अर्ज सुनावणीसाठी आला तेव्हा खंडपीठानं मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली.
वाचा: मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्ज व्यवसायात? समीर वानखेडे म्हणाले…