अहमदनगर रुग्णालय आग : मृतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर


हायलाइट्स:

  • आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
  • मृत ११ पैकी सहा जणांचा मृत्यू गुदमरून
  • एकाच्या मूत्यूचे नेमके कारण स्पष्ट नाही

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार मृत ११ पैकी सहा जणांचा मृत्यू गुदमरून तर तिघांचा होरपळून, एकाचा ६० टक्के भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे. तसंच एका रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्यानं व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

रुग्णालयात शनिवारी लागलेल्या आगीत या ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. आग प्रकरणाची चौकशी आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी तो महत्वाचा ठरणार आहे. त्याचा प्राथमिक अहवाल हाती आला आहे. त्यानुसार सहा रुग्णांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे आढळून आले. इतर तिघे आगीत होरपळले असल्याचं दिसून आलं. एक रुग्ण ६० टक्के भाजलेला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. एकाच्या मूत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मोठी घडामोड! SIT अॅक्शन मोडमध्ये; आर्यन खानला समन्स

या कक्षात १७ रुग्ण होते. त्यातील सहा जणांना अन्यत्र हलवण्यात यश आलं असून त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, या घटनेत केवळ ऑक्सिजन बंद पडल्याने नव्हे तर भाजल्यानेही मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने आगीची भीषणता लक्षात येते. या अहवालाच्या आधारे तपासाची आणि चौकशीची पुढील दिशा स्पष्ट होत आहे.

ही आग कशी लागली आणि रुग्णांचे मृत्यू कसे झाले, यासंबंधी सुरुवातीला वेगवेगळी माहिती पुढे येत होती. त्यानुसार दावे प्रतिदावे आणि राजकीय आरोपही सुरू झाले होते. पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेही काम सुरू केले आहे. त्याच दरम्यान मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्याने तपास आणि चौकशीची दिशा ठरणार आहे. केवळ ऑक्सिजन बंद पडला म्हणून नव्हे किंवा स्थलांतर करताना म्हणून नव्हे तर आगीत भाजल्यानेही मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत असल्याने एकूणच हलगर्जीपणा झाला, हेही स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी नेमका दोष कोणाचा हे पोलिसांना आणि चौकशी समितीला शोधावे लागणार आहे. त्यानुसार कारवाईसाठी जबाबदारी स्पष्ट केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: