हायलाइट्स:
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद
- मोहित कंबोजवर केले धक्कादायक आरोप
- समीर वानखेडे यांच्यावरही साधला निशाणा
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मुंबई ड्रग्ज क्रुझ प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. तसंच, मोहित कंबोज हे क्रुझ पार्टी प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, मोहित कंबोज व समीर वानखेडे यांच्यात चांगले संबंध असल्याचंही मलिकांनी म्हटलं आहे.
‘मुंबईत मोबित कंबोजच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरू केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरुन कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील,’ असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांच्यातील संबंध चांगले आहेत. वानखेडे आणि कंबोज हे ७ तारखेला ओशिवराच्या कब्रस्तानाच्या बाहेर भेटले. त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचे सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
‘शहरात ड्रग्जच्या नावावर निरपराध लोकांना घाबरवलं जात आहे. हजारो कोटींची वसुली होत आहे याच्या विरोधात मी लढतोय. गेल्या महिन्याभरापासून ही बातमी चर्चेत आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी वक्तव्य केलं होतं की, पहिल्यांदाच समुद्रात कारवाई झाली. पण खरंतर असं काहीच नव्हतं. पब्लिसिटीचा स्टंट होता हा, लोकांना टार्गेट केलं गेलं. आर्यनचं अपहरण केलं आणि खंडणीची मागणी केली गेली,’ असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.