हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्या मुलाने ई़डी चौकशी टाळली
- चौकशीसाठी हजर झाल्यास अटकेची वाटतेय भीती.
- अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाचे दार ठोठावणार.
वाचा: आर्यन खान NCB कार्यालयात झाला हजर; बोलणं टाळलं, कारण…
ऋषिकेश देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी याबाबत माहिती दिली. ईडीने ऋषिकेश यांना आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते मात्र ते हजर झालेले नाहीत. त्यांच्यापुढे जे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा ते वापर करणार आहेत. अटकपूर्व जामिनासाठी आम्ही सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार आहोत, असे इंदरपाल सिंग यांनी सांगितले. अनिल देशमुख यांचा अर्ज सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तिथे ईडीने प्रतिज्ञापत्र देताना केवळ चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं होतं. त्यानुसार देशमुख हे चौकशीसाठी हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली. ही बाब लक्षात घेता ऋषिकेश यांनाही अशाचप्रकारे अटक केली जाईल, असे आम्हाला वाटत असून त्यासाठीच आम्ही कायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत, असेही सिंग यांनी नमूद केले.
वाचा:संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दणका; आता दिले ‘हे’ निर्देश
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला होता. देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा गैरवापर केला व सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा परमबीर यांचा आरोप आहे. या आरोपांची न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पाचवेळा समन्स बजावूनही देशमुख हे ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यानंतर सोमवारी अचानक देशमुख ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांची तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली व नंतर त्यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. देशमुख व अन्य काही जणांवर या प्रकरणात २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.
वाचा:किरण गोसावीबाबत धक्कादायक पुरावे हाती; मुंबई पोलीस करणार मोठी कारवाई