Nawab Malik: नेमकं खरं काय?; समीर वानखेडे यांच्या ‘या’ विधानावर मलिक यांचा आक्षेप


हायलाइट्स:

  • आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास एनसीबी एसआयटीकडे.
  • तपासातून हटवण्यात आले नसल्याचा समीर वानखेडे यांचा दावा.
  • मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या विधानावर घेतला आक्षेप.

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास एनसीबी मुंबई कार्यालयाकडे आता नसेल. एनसीबीच्या महासंचालकांनी एक विशेष तपास पथक ( एसआयटी ) नेमलं असून या पथकाकडून या प्रकरणांचा तपास आता करण्यात येणार आहे. या तपासात एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील संबंधित तपास अधिकारी साह्य करणार आहेत, असे एनसीबीने म्हटले आहे. यावर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यावरच मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. ( Nawab Malik Vs Sameer Wankhede Updates )

वाचा: आर्यन प्रकरणातून वानखेडेंना हटवले; मलिक आता मोठा धमाका करणार, म्हणाले…

आर्यन खान, समीर खान व अन्य चार प्रकरणांचा तपास समीर वानखेडे व त्यांच्या टीमकडून काढून घेण्यात आला आहे, अशा बातम्या आल्या आहेत. त्यावर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला कोणत्याही ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आलेले नाही. याबाबत मीच कोर्टात याचिका दाखल केली होती. संबंधित प्रकरणांचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करावा, अशी विनंती त्यात मी केली होती. म्हणूनच आर्यन खान आणि समीर खान प्रकरणांचा तपास आता दिल्ली मुख्यालयातील एनसीबीचे विशेष तपास पथक करत आहे. हा एनसीबीच्या दिल्ली आणि मुंबईतील टीमच्या समन्वयाचा एक भाग आहे’, असा दावा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केला आहे. त्यांनी एएनआयकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे. याच प्रतिक्रियेवर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

वाचा: आर्यन खान NCB कार्यालयात झाला हजर; बोलणं टाळलं, कारण…

‘यात एकतर समीर वानखेडे यांचे विधान चुकीच्या पद्धतीने समोर आले आहे किंवा वानखेडे हे देशाची दिशाभूल करत आहेत, असे दिसत आहे. वानखेडे यांच्यावर खंडणीवसुली आणि भ्रष्टाचाराचा जो आरोप झाला आहे, त्याची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येऊ नये. हा तपास सीबीआय किंवा एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली होती. त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळेच वानखेडे यांचे ताजे विधान दिशाभूल करणारे आहे. यात नेमके खरे काय आहे हे देशासमोर यायला हवे’, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

वाचा: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे; मात्र, वानखेडेही असतील टीमचा भागSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: