‘भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितकी महागाई कमी होईल’


हायलाइट्स:

  • पेट्रोल-डिझेल दर कपातीवरूनही केंद्र सरकार लक्ष्य
  • शिवसेने नंतर राष्ट्रवादीनंही केली टीका
  • पोटनिवडणुकीत हरल्यामुळं दर कपातीचा निर्णय – राष्ट्रवादी

मुंबई: आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या चढत्या किंमतींवरून विरोधकांचं लक्ष्य ठरलेलं केंद्रातील भाजप सरकार आता दर कपात केल्यामुळं विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय विरोधकांनी देशातील पोटनिवडणुकांच्या निकालांशी जोडला आहे. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘भाजपला तुम्ही जितक्या वेळा पराभूत करणार, तितके पेट्रोल, डिझेलचे भाव कमी होत राहणार,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसनं जनतेला उद्देशून म्हटलं आहे. (NCP Leader Nawab Malik on Fuel Prices)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्यानं वाढत होते. पेट्रोलनं लिटरमागे १०० रुपयांचा टप्पाही ओलांडला होता. त्यामुळं लोकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. विरोधकांनी या मुद्द्यावरून सतत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मोदी सरकारविरोधात सोशल मीडियात उपरोधिक शेरेबाजी सुरू झाली होती. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं अखेर पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यामुळं पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झालं आहे. मात्र, त्यावरूनही सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

वाचा: पेट्रोल, डिझेल स्वस्त का झालं?; शिवसेनेनं दाखवलं पोटनिवडणुकांकडं बोट

केंद्र सरकारनं इंधनाच्या दरात केलेली कपात अत्यंत किरकोळ आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवामुळंच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याच अनुषंगानं जनतेला आवाहन केलं आहे. ‘तुम्ही भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. सततची ही लूट थांबवायची असेल तर भाजपला पूर्ण पराभूत करा,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘जनतेला केंद्र सरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. परंतु हे दिवाळी गिफ्ट नाही. या देशात ‘भाजप हराओ, दाम घटाओ’ असं आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले आहेत,’ याकडं मलिक यांनी लक्ष वेधलं.

वाचा: ते माझी ताकद ओळखून आहेत; नवाब मलिक यांचा रोख कुणाकडे?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: