हायलाइट्स:
- शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागणी
- कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन गडाख टार्गेट
- मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी दिली माहिती
गेल्या महिन्यात ३० तारखेला प्रतीक बाळासाहेब काळे (वय २७ रा. नेवासा) याने नगरजवळ गळफास लावून घेत आत्महत्या केली. तो गडाख यांच्या मुळा एज्युकेशन संस्थेत कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून नोकरीला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ करून ठेवला होता. त्यामध्ये त्याने संस्थेतील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मंत्री गडाख आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची नावेही त्याने घेतलेली आहेत. त्या आधारे बहीण प्रतिक्षा हिने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सात जणांविरूदध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली आहे. मात्र, फिर्यादीत गडाख कुटुंबातील सदस्यांचा उल्लेख नाही.
वाचाः पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने गडाखांच्या राजीनाम्याची मागणी केली. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सर्वप्रथम नगरमध्ये यासंबंधी गडाख यांच्यावर आरोप केले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंबईत पत्रकार परिषद घेऊन गडाखांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर गडाख यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपला या प्रकरणाशी संबंध नाही. काळे हा संस्थेतील कर्मचारी असला तरी तो स्वीय सहाय्यक नव्हता, असेही गडाख यांनी म्हटले आहे.
आता प्रतीकच्या ज्या बहिणीने यासंबंधी फिर्याद दिली आहे. तिनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रतीकने आपल्याला पूर्वीच सर्व सांगितले होते. त्यावरून यात गडाख कुटुंबियांचा दोष दिसत नाही. तसे असते तर आम्ही सोडले नसते. प्रतीक याने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ नशेत केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याने त्यात नावे घेतली असावीत, असेही बहिणीचे म्हणने आहे.
वाचाः दिवाळीत नागरिकांना मोठा दिलासा; राज्यातील ‘या’ १० जिल्ह्यांत १० पेक्षा कमी रुग्ण
एमआयडीसी पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे, त्याची फिर्याद याच बहिणीने त्याच दिवशी दिलेली आहे. व्हिडिओमध्ये घेतलेल्या संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही त्यात समावेश आहे. त्यातील काहींना अटकही झालेली आहे.