नाशिकरोड प्रेसमध्ये आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कामगारांनी ‘ई पासपोर्ट’ छपाईसुद्धा यशस्वी करून दाखवली आहे. सध्या एक हजार ‘ई-पासपोर्ट’ प्रायोगिक तत्त्वावर छापण्यात आले आहेत. ते विविध भागांतील हवामानात यशस्वीपणे कार्यरत राहतात, की नाही, यासाठी देशभर पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर वर्षाला एक कोटी ‘ई-पासपोर्ट’ची छपाई केली जाणार आहे. या पासपोर्टमध्ये ‘एटीएम’प्रमाणे इलेक्ट्रॉनिक सर्किट असल्याने त्याची सुरक्षा भेदणे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वीची अनेक पारंपरिक पासपोर्ट केंद्रे सरकार टप्प्याटप्प्याने रद्द करणार आहे. त्यांच्या जागी ‘ई-पासपोर्ट’ द्यावे लागणार असल्याने वाढीव कामाचे शिवधनुष्य प्रेस कामगारांना पेलावे लागणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास येत्या काळात परदेशातूनही पासपोर्ट छपाईची ऑर्डर नाशिकरोड प्रेसला मिळू शकते.
दोन मोठ्या ऑर्डर्स
या प्रेसला परराष्ट्र मंत्रालयाने ८५ लाख पारंपरिक पासपोर्ट छपाईची ऑर्डर दिली आहे, तर रिझर्व्ह बँकेनेही ४९० कोटी नोटा छपाईचे निर्देश दिले आहेत. लॉकडाउननंतर प्रथमच मोठ्या ऑर्डर मिळाल्याने ‘प्रेस’ला नवसंजीवनी मिळाली आहे. यापूर्वी नाशिकरोडची ‘इंडिया सिक्युरिटी’ आणि ‘नोट प्रेस’ कामगारांनी नोटाबंदी काळातही सुटी न घेता युद्धजन्य स्थितीप्रमाणे काम करून नोटांची टंचाई दूर केली होती. याबद्दल पंतप्रधानांनीही त्यांचे कौतुक केले होते. या प्रेसमध्ये आता जपानी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक मशिनरी बसविली जात असल्याने उत्पादनक्षमता वाढून वेळ, खर्च, मेहनत वाचणार आहे.
…असा असेल ई-पासपोर्ट
ई-पासपोर्ट हे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन कार्ड (डिजिटल) असून, ते एटीएम कार्डासारखे असते. मोबाइल कार्डाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मायक्रो चीप त्यात असते. रिमोटद्वारे त्यातून डेटाची चोरी होणे शक्य नाही किंवा डेटा नष्टही होऊ शकत नाही. ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चीपमध्ये धारकाचा फोटो व माहिती असते. तळाला इंटरनॅशनल बायोमेट्रिक सिम्बॉल असते. ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित व्हावा म्हणून भारताची ‘नॅशनल इन्फोमेटिक सेंटर’ संस्था प्रेसबरोबर काम करीत आहे. ‘ई-पासपोर्ट’चे फोल्डिंग, शिलाई, पेस्टिंग, नंबरिंग, बारकोड ही कामे परदेशी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. जगातील ७० टक्के देशांप्रमाणेच भारताचाही ‘ई-पासपोर्ट’ असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न नाशिकमध्ये पूर्ण होत आहे. हे काम किमान दोन दशके चालणार आहे.
दुसरे लॉकडाउन १६ एप्रिल २०२१ रोजी सुरू झाले तेव्हापासून पासपोर्टची ऑर्डर नव्हती. आता ‘ई-पासपोर्ट’सोबतच पारंपरिक पासपोर्ट आणि नोटांची मोठी ऑर्डर मिळाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही कामे सर्वांच्या सहकार्याने वेळेत पूर्ण करून विश्वास सार्थ ठरवू.
-जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, प्रेस कामगार नेते