हायलाइट्स:
- ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
- शिरोळ तालुक्यात दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त
- तीन कंपन्यांचे व्यवसाय परवाने रद्द
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खवा तयार करण्याचे प्रमाण जास्त आहे. या भागातील खवा केवळ जिल्ह्याच नव्हे तर शेजारच्या अनेक जिल्ह्यातही पाठवला जातो. नृसिंहवाडीचा खवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पदार्थात अलिकडे भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी होत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खव्याला प्रचंड मागणी असते. याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील काही कंपन्या पावडर वापरून बनावट खवा तयार करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार बुधवारी पहाटे अचानक एकाचवेळी तीन कंपन्यावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला.
आर्यन खान प्रकरणात ५० लाखांची डील करून देणारा सॅम डिसूझा घाबरला!
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी भल्या पहाटे शिवरत्न मिल्क, बालाजी मिल्क आणि गणेश मिल्क या तीन कंपन्यांच्या गोडाउनमध्ये पोहोचले. तेथे पावडरच्या सहाय्याने खवा तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. टाकवडे, आकिवाट, मजरेवाडी या गावातून तब्बल वीस लाखाचा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर काही माल नष्ट करण्यात आला. या तीन कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेल्या या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी शेळके यांनी केली.
वाचा: दिवाळीनंतर नवाब मलिक मोठा धमाका करण्याच्या तयारीत; ‘हे’ ट्वीट सगळं सांगून जातं!