हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद शुक्लांचं वादग्रस्त वक्तव्य
- विरोधकांवर थेट ‘देशद्रोहा’ आरोप
- अखिलेश यादवांना ‘आयएसआय’कडून संरक्षण आणि आर्थिक मदत
अखिलेश यांच्या भाषणात जिनांचा उल्लेख
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांनी एकाच संस्थेतून शिक्षण घेतलं होतं आणि बॅरिस्टर बनले होते. तसंच त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत दिली आणि संघर्षातून कधीही काढता पाय घेतला नाही, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं. रविवारी सरदार पटेल यांच्या १४६ व्या जयंतीच्या निमित्तानं हरदोईमध्ये एका जाहीर सभेत बोलताना अखिलेश यांनी हे वक्तव्य केलं होतं.
भाजप मंत्र्याकडून देशद्रोहाचा आरोप
यावर, पाकिस्तान आणि तालिबानला जे हवंय तशीच वक्तव्य अखिलेश यादव करत असल्याचं भाजप मंत्री आनंद शुक्ला यांनी म्हटलंय. ‘कदाचित अखिलेश यादव यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून संरक्षण आणि सल्ले मिळत असावेत. तसंच या संस्थांकडून त्यांना आर्थिक मदतही मिळत असावी’, असा संशयाचा सूर व्यक्त करत शुक्ला यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधलाय. आयएसआयच्या सूचनेवरूनच अखिलेश यादव हे मोहम्मद अली जिनांचं कौतुक करत असल्याचा दावा शुक्ला यांनी केला.
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी जिनांची तुलना करणं ‘निंदणीय’ असल्याचं शुक्ला यांचं म्हणणं आहे. तसंच याबद्दल अखिलेश यादव यांनी माफी मागावी अशी मागणीही शुक्लांनी केलीय.
राजभर यांच्यावरही देशद्रोहाचा आरोप
शुक्ला यांनी यापूर्वी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यावरही दहशतवादी संघटनांकडून मदत घेत असल्याचा आरोप केला होता. गेल्या २७ ऑक्टोबर रोजी राजभर यांच्या पक्षानं अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केलीय.