दीपावली सणामागील शास्त्र, इतिहास, परंपरा आणि काळानुसार बदललेले स्वरूप

दीपावली सणामागील शास्त्र, इतिहास, परंपरा आणि काळानुसार बदललेले स्वरूप

प्रस्तावना – अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी केली जाते. हे करण्यामागे शास्त्र आहे ते समजून घेऊन कृती केल्यास त्याचा अधिकाधिक लाभ होईल.

संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते प्रत्येक प्रांत,देश यामध्ये तेथील चालीरीती नुसार सण साजरा होतो. युगानुयुगे चालत आलेल्या या सणाचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे हे सत्य नाकारता येणार नाही. हिंदू धर्मातील सण,उत्सव,व्रते यामागे शास्त्र आहे त्याच प्रमाणे वर्ष्याचे 12 महिन्यात येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्याचा मनुष्याला लाभ व्हावा हा उदात्त हेतू यामागे आहे.प्रत्येक सणाचे शास्त्र समजून घेऊनच सण साजरे केले तर त्याचा लाभ होईल.या लेखा तून दिवाळी या सणाला इतिहास,शास्त्र, परंपरा आणि सध्याचे बदलते स्वरूप ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

दीपावली सणाचा इतिहास

दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. अशी कथा आहे यानुसार पूर्वापार हा सण साजरा केला जात आहे.

आकाशदीप लावण्यामागील शास्त्र आणि त्याचे बदलते स्वरूप

त्रेतायुगामध्ये आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली.प्रतिवर्षी दिवाळी हा सण आला कि घरोघरी आकाशदीप (आकाशकंदील) लावतात.आकाश दीप लावण्याची प्रथा हि हिंदू धर्मात पूर्वापार चालत आलेली आहे. या रूढी,परंपरा यांना काळा नुसार बदलत गेल्या आणि त्याचे असणारे महत्व कुठेतरी कमी होत असून केवळ एक सण आणि त्यामधील कृती किंवा काही अंशी एक हौस म्हणून हे केले जात असल्याचे लक्षात येते. त्यामुळे बाजारात अनेक नवीन नवीन आकारात,नावीन्य पूर्ण वाटणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून आकाशदीप बनविले जात आहेत.गेल्या काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या आकाशकंदिलांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. परंतु असे करताना आकाशदीप (आकाशकंदील) लावण्यामागील शास्त्र,इतिहास काय आहे हे जाणून घेतले तर त्यातून योग्य कृती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

दिवाळीतील दिवसांचे महत्त्व

वसुबारस आणि गुरुद्वादशी – आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात.या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात.समुद्रमंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. याच तिथीला गुरुद्वादशीच्या निमित्ताने शिष्य गुरूंचे पूजन करतात. दररोज देशात हजारो गोहत्या होत आहेत त्यामुळे गोवंशाची संख्या कमी होत चालली आहे. आज वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा करणारा हिंदु गोमातेची हत्या होतांना पहातो, यासारखे दुर्दैव कोणते ? देशात होणारी गोहत्या आणि त्यावर शासनाचे निर्बंध नसणे, हे ज्वलंत उदाहरण आहे.गोहत्येच्या विरोधात लढतांना प्राण गमावलेले संत या देशात होऊन गेले, गोहत्या रोखण्यासाठी लढणार्‍या गोप्रेमींवर जीवघेणी आक्रमणे होतात, मात्र काही राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. हिंदू धर्मात गायीला गोमाता असे संबोधले आहे कारण गायीच्या माध्यमातून होणार्‍या लाभांची तुलना इतर कोणत्याही पशूशी होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वच हिंदूंनी पुढाकार घेऊन गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

धनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी)

आश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे.व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात.

 ‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते.या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्‍या अर्थाने प्राप्त होईलच असे नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो परंतू ‘साधना करून मोक्ष मिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. हे लक्ष्यात घेऊन या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.

   तसेच धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. 

 आज कोरोनासारख्या महामारीचा वाढता संसर्ग पाहता हिंदु संस्कृतीमध्ये सणांच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची किती काळजी घेतली आहे हे प्रकर्षाने लक्षात येते.  

यमदीपदान

प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे.मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. ‘१३’ या अंकात यमाला तृप्त करण्याचे शब्दबीजात्मक स्वरूपाचे सामर्थ्य असल्यामुळे त्रयोदशीच्या दिवशी १३ दीपांच्या स्वरूपात मृत्यूच्या पाशातून सुटका करण्यासाठी यमाला प्रार्थना केली जाते.’

नरक चतुर्दशी 

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते तसेच प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

 आयुर्वेदशास्त्र आणि भारतीय संस्कृती यांची सांगड प्रत्येक बाबतीत अनुभवास येते. परंपरे नुसार व संस्कृतीनुसार घरोघरी तयार केले जाणारे दीवाळीचे पदार्थ आणि हिवाळ्यात आयुर्वेदानुसार खायला सांगितलेले पदार्थ एकमेकांशी तंतोतंत जुळतात. प्राचीन काळापासून आपण उत्साहाने साजरी करीत असलेली दिवाळी हिवाळ्याच्या सुरुवातीला येते. तसेच दिवाळीमध्ये सांगितलेले अभ्यंग स्नान हे विशेषतः त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र सद्यस्थितीत दिवाळीच्या कालावधीत सुटीचे निमित्त साधून सहलीला जाण्याची प्रथा सुरू झाली आहे. नरकचतुर्दशी, पाडवा या सणांच्या दिवशी पहाटे ५ किंवा सकाळी ६ वाजता दिवाळी पहाट गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हिंदूही धर्माचरणाला डावलून अशा कार्यक्रमांना आवडीने उपस्थित रहातात, हे दुर्दैवी आहे.

लक्ष्मीपूजन

  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. या दिवशी श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत असते. या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी श्री लक्ष्मीदेवीची पूजा यथासांग करावी. 

  दिवाळी हा सण पावित्र्याचा, मांगल्याचा, आनंदाचा आहे.मात्र दुर्दैवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीचे चित्र असणारे फटाके फोडले जातात. फटाक्यांवर लक्ष्मीदेवी, श्रीकृष्ण आदी देवता व राष्ट्रपुरूष यांची चित्रे असलेले फटाके सुद्धा फोडले जातात. देवता आणि राष्ट्रपुरुषांचे चित्र असलेले फटाके वाजवल्यावर त्या चित्रांचे तुकडे इतरत्र पडून त्यांचा अनादर होतो आणि धर्महानी केल्याचे पातक लागते. अशा पद्धतीने दिवाळी साजरी करून आपण खरोखरीच कोणता आनंद मिळवत आहोत याचा विचार करण्याची गरज आहे.

   फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण तर होतेच तसेच जीवित आणि वित्त हानीच्या घटना सुद्धा घडतात. फटाके उडवणे, हा धर्माचरणाचा भाग नाही. सर्वच दृष्टीने विनाशकारी फटाक्यांवर केवळ मौजमजेसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अर्पण करणे जास्त संयुक्तिक ठरेल. 

बलीप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते. अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात. या दिवशी अभ्यंगस्नान करून स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धन पूजा करतात. नवीन वस्त्रालंकार घालून, पक्वानांचे भोजन करून आनंद साजरा करतात.

भाऊबीज (यमद्वितीया)

कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव पडले. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.

सध्याच्या काळात कित्येक भगिनींवर बलात्कार होत आहेत, एकतर्फी प्रेमातून कित्येकींची उघड उघड हत्याही होते. लव्ह जिहाद सारख्या घटना घडत आहेत,याची खऱ्या अर्थाने जागृती होणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे. याचबरोबर भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल.

दीपावलीचे बदलते स्वरूप

दिवाळी हा सण पावित्र्याचा, मांगल्याचा, आनंदाचा आहे. दिवाळीच्या धर्माचरणाच्या अंतर्गत येणार्‍या तेलाच्या पणत्यांची आरास करणे, पाच दिवस सांगितलेल्या विविध पूजा आणि धार्मिक कृती करणे, नवीन वस्त्रे आणि दागिने परिधान करणे, नातेवाइकांना भेटणे, तसेच किल्ले, रांगोळ्या, फराळ, आकाशदिवे आदी गोष्टी पुरेशा आनंद देणार्‍या आहेत. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. धर्मशास्त्र माहीत नसल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक सणांत अपप्रकारांना उधाण येत आहे. काळानुसार दीपावलीचे स्वरूप बदलत आहे. पण जर शास्त्र समजून घेऊन आपण हा सण साजरा केला तर त्याचा आपल्याला शारीरिक, अध्यात्मिक दृष्ट्या लाभच होणार आहे. आपल्या संस्कृतीने एवढा नयनरम्य आणि डोळे दीपवणारा दिलेला दीपोत्सव केवळ मजा करण्याच्या नावाखाली धूर आणि आवाज यांच्या अतिरेकात वाया न घालवता दिवाळीच्या दिवसांत अधिकाधिक साधना (म्हणजेच नामजप, प्रार्थना, सत्सेवा, दान आदी) करण्याचा प्रयत्न करावा. दीपावलीच्या निमित्ताने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी काहीतरी करण्यासाठी यथाशक्ती पाऊल उचलले, तरच हा सण खर्‍या अर्थाने साजरा होईल.

संकलक : श्री. हिरालाल तिवारी , सौजन्य : सनातन संस्था ,९९७५५९२८५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: