हायलाइट्स:
- रुग्णालयात झिका विषाणू रुग्णांसाठी विशेष वॉर्डची व्यवस्था
- रुग्णांत गर्भवती महिलांचाही समावेश
- गर्भवती महिला आणि गर्भात वाढणाऱ्या भ्रूणासाठी ‘झिका’ धोकादायक
झिका विषाणू संक्रमित आढळलेल्या १४ रुग्णांत एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. यासोबतच, शहरातील एकूण झिका संक्रमितांची संख्या २५ वर पोहचलीय.
शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयासहीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीनं एक बैठक बोलावली आहे.
याअगोदर, १ नोव्हेंबर रोजी कानपूरमध्ये झिका विषाणू संक्रमित सहा रुग्ण आढळून आले होते. कानपूरच्या चकेरी भागातील या रुग्णांत चार महिलांचा समावेश आहे.
प्रशासनाकडून खबरदारी
ऑक्टोबरमध्ये राज्यात पहिला झिका संक्रमित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सरकारनं अधिक चाचण्या घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तापाची लक्षणं दिसलेल्या ६४५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. झिका विषाणूचा संसर्ग डासांमुळे होत असल्यानं स्वच्छता, फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
झिकाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय राबवले जात असतानाच, या रुग्णांवर उपचारासाठी काशीराम रुग्णालयात झिका संक्रमित रुग्णांसाठी एका वेगळ्या वॉर्डची व्यवस्था करण्यात आलीय.
कसा फैलावतो झिका विषाणू?
‘एडीज एजिप्ती’ नावाच्या मच्छर प्रजातीच्या चाव्यामुळे झिका विषाणू फैलवत असल्याचं समोर आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, एडीज मच्छर सामान्यत: दिवसा चावा घेतात. याच मच्छरांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा फैलाव होतो. यामुळे स्वस्थ व्यक्तीला कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नसली तर गर्भवती महिला आणि गर्भात वाढणाऱ्या भ्रूणासाठी हा विषाणू धोकादायक ठरू शकतो.
झिका संक्रमणाची लक्षणं?
– झिका संक्रमणाची लक्षणं सामान्यत: डेंग्यूप्रमाणेच दिसून येतात
– तापं येणं, शरीरावर डाग दिसून येणं, सांधेदुखी ही झिका संक्रमणाची काही सामान्य लक्षणं आहेत
– रोगप्रतिकारक्षमता कमकुवत असणाऱ्या व्यक्तींसाठी हा विषाणू घातक ठरण्याची शक्यता असते